होमपेज › Satara › सुधन्वा सातार्‍यात दोनवेळा ‘रेकॉर्ड’वर

सुधन्वा सातार्‍यात दोनवेळा ‘रेकॉर्ड’वर

Published On: Aug 13 2018 1:22AM | Last Updated: Aug 12 2018 10:47PMसातारा : विठ्ठल हेंद्रे 

महाराष्ट्राला हादरवून सोडणार्‍या नालासोपारा, मुंबई येथे देशी बॉम्बसह स्फोटकाचे पदार्थ सापडल्यानंतर त्याचे थेट कनेक्शन सातारा शहराशी असल्याचे सुधन्वा याच्या माध्यामातून उघड झाल्याने सातारा जिल्हा पोलिस दलही हादरले आहे. गोंधळेकर याच्याविरुध्द सातार्‍यातही दोन गुन्हे दाखल असून गाईंच्या वाहतूक प्रकरणातही त्याचा पोलिसांशी वाद झाल्याची धक्‍कादायक माहिती समोर आली आहे.

नालासोपारा येथे शुक्रवारी हिंदुत्ववादी संघटनेचा सक्रीय कार्यकर्ता वैभव राऊत याच्या घराशेजारील इमारतीच्या गाळ्यात राज्य दहाशतवादीविरोधी पथकाला (एटीएस) 20 देशी बॉम्बसह सुमारे 50 बॉम्ब बनतील, असे स्फोटकाचे पदार्थ व इतर साहित्य सापडले. ही बॉम्बसदृश स्फोटके पाहिल्यानंतर महाराष्ट्रात खळबळ उडाली. वैभव याच्याकडे प्राथमिक चौकशी केल्यानंतर त्याने सुधन्वा गोंधळेकर याचे नाव घेतल्यानंतर मुंबई ‘एटीएस’च्या तपासात गोंधळेकर सातारचा असल्याचे समोर आले. अखेर पुणे ‘एटीएस’ने शुक्रवारीच त्याच्याही मुसक्या आवळल्या. सुधन्वा हा मूळचा सातार्‍यातील करंजे पेठेतील आहे.
मुंबई ‘एटीएस’ने संशयित वैभव राऊत, सुधन्वा गोंधळेकर व कळस्कर यांना अटक करुन न्यायालयात हजर केले असता त्यांना पोलिस कोठडी सुनावली. राऊत, गोंधळेकर याच्या चौकशीत त्यांचे पुणे व नातेपुते येथील कनेक्शन उघड झाले.

त्यानुसार मुंबई ‘एटीएस’ने कारवाई केली असता पुन्हा गावठी पिस्टल, गावठी कट्टा, एअरगन, 10 पिस्टल बॅरल असा डोळे चक्रावणारा बंदूकीचा साठा व ते बनविण्यासाठी लागणारे इतर साहित्य सापडल्याने शनिवारी दुसर्‍या दिवशी पुन्हा या कारवाईने राज्यात खळबळ उडाली.

सुधन्वाच्या या कारनाम्यांनी शहरासह जिल्ह्यात केवळ याच विषयाची चर्चा सुरु आहे. सुधन्वा गोंधळेकर याच्याबाबत माहिती घेत असतानाच अजून अनेक धक्‍कादायक बाबीही समोर येत आहेत. सुधन्वा हा शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचा कार्यकर्ता असल्याचे स्पष्ट झाले आहे. सुधन्वा उच्च शिक्षित असून  तो ग्राफीक डिझायनर म्हणून काम करीत होता. गेल्या दोन वर्षांपासून मात्र साताराबरोबरच पुणे येथेही कामानिमित्त तो वारंवार जात होता. यामुळेच सातार्‍यातील त्याचा वावर कमी झालेला आहे. एटीएसच्या कारवाईमुळे गोंधळेकर कुटुंबीयांसह शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनाही धक्‍का बसला आहे.

सुधन्वा गोंधळेकर नेमका कोण? सातार्‍यात तो कसा राहत होता? सातार्‍यातून पुणे येथे कधी गेला आहे? यापूर्वीचे  त्याचे सातार्‍यातील ‘रेकॉर्ड’ काय आहे? त्याच्यावर किती व कोणते गुन्हे दाखल आहेत? अशा अनेक प्रश्‍नांची उत्तरे सातारा पोलिस शोधत आहेत. दै.‘पुढारी’ही या प्रकरणाच्या मुळाशी जात असताना त्याच्यावरील दोन गुन्हे समोर आले आहेत. 

2014 साली सातार्‍यात गोंधळ झाला होता त्यावरुन पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्यांमध्ये सुधन्वाचाही संशयित आरोपी म्हणून उल्‍लेख होता. साधारण दोन वर्षांपूर्वीही त्याने बॉबे रेस्टॉरंट येथे पोलिसांशी हुज्जत घातल्याची पोलिस दप्‍तरी नोंद आहे.

सुधन्वाकडे मोबाईल आहे...

सुधन्वा दोन वर्षांपूर्वी सातार्‍यात शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचा कार्यकर्ता होता. यावेळी तो विविध कार्यक्रमाच्या निमित्ताने समाजात वावरत होता. दोन वर्षांपूर्वी तो मोबाईलही वापरत असल्याचे समोर आले आहे. पोलिस दलातील काही कर्मचार्‍यांकडे त्याचा मोबाईल क्रमांकही असल्याचे खात्रीशीर वृत्त आहेे. अर्थात संघटनेच्या माध्यमातून तो काम करीत असल्याने सुधन्वाचा मोबाईल क्रमांक पोलिसांकडे आहेे. नालासोपारा कारवाईत सातारच्या सुधन्वाचा संबंध आल्याने सातारा पोलिस पुरतेच गांगरुन गेले आहेत. सुधन्वाचा मोबाईल क्रमांक जुना आहे. तो सध्या मोबाईल वापरतो की नाही? तोच क्रमांक सुरु आहे का? दुसरा कोणता त्याच्याकडे मोबाईल क्रमांक आहे का? याबाबत मात्र सातारा पोलिसांना माहिती नाही.

पोवई नाक्यावरील ‘त्या’ गोंधळात सुधन्वा गोंधळेकरचा सहभाग

2014 साली सातार्‍यात राष्ट्रपुरुषाच्या अवमानप्रकरणी मोठा गोंधळ उडाला होता. त्यामुळे समाजातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न ऐरणीवर आला होता. या आंदोलनात सुधन्वा गोंधळेकर पोवई नाक्यावर सहभागी झाला होता. पोलिस जमावाला शांततेचे आवाहन करीत असताना जमाव कोणाचेच ऐकत नव्हता. यावेळी गोंधळेकरही आक्रमकपणे बोलत होता. याप्रकरणी सातारा शहर पोलिसात वेगवेगळे गुन्हे दाखल असून त्यामध्ये संशयित आरोपी म्हणून गोंधळेकर याचेही नाव आघाडीवर होते. अशाप्रकारे सुधन्वा याचा सातारा पोलिसांशी पहिल्यांदा संबंध आलेला आहे.

सुधान्वाची सातारा पोलिसांशी हुज्जत

2015- 16 मध्ये सुधन्वा गोंधळेकरने  गाईंची बेकायदाकत्तल होत असल्याने आवाज उठविला होता. त्यावेळी गाईंची कत्तल करण्यासाठी कोरेगावहून एक टेंम्पो सातार्‍यात येत असल्याची माहिती त्याला मिळाली होती. याबाबतची माहिती सुधन्वाने त्याच्या इतर सहकार्‍यांना देवून त्यांना बॉबे रेस्टॉरंट चौकात बोलावून घेतलेे. सातारा पोलिसांना बॉम्बे रेस्टॉरंट येथे जमाव जमत असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनीही घटनास्थळी धाव घेतली. यावेळी पोलिसांनी जमावाला त्याबाबत विचारणा केल्यानंतर गायींची बेकायदा वाहतूक होत असल्याचे सांगितले. पोलिसांनी जमावाला शांततेचे आवाहन केले. कारवाई करण्याचे आश्‍वासन देत कोणीही कायदा व सुव्यवस्था हातात घेवू नये, असेही आवाहन केले. मात्र गोंधळेकर याने गोंधळ घालत पोलिसांशी हुज्जत घातली. त्यामुळे बॉम्बे रेस्टॉरंटवर तणावाचे वातावरण निर्माण झाले. मात्र, असे कोणतेही वाहन तिथे आले नाही. त्यामुळे अखेर गोंधळेकर आपल्या कार्यकर्त्यांसोबत तेथून निघून गेला होता.