Sun, Aug 25, 2019 04:44होमपेज › Satara › वीरपत्नीची यशोगाथा दहावी अभ्यासक्रमात

वीरपत्नीची यशोगाथा दहावी अभ्यासक्रमात

Published On: Apr 07 2018 1:37AM | Last Updated: Apr 06 2018 10:53PMसातारा : प्रवीण शिंगटे 

दहावीचा अभ्यासक्रम यंदापासून बदलला असून यामध्ये मराठी पाठ्यपुस्तकात अतिरेक्यांशी दोन हात करताना धारातीर्थी पडलेल्या शहीद कर्नल संतोष महाडिक यांच्या वीरपत्नी कर्नल स्वाती महाडिक यांच्या यशोगाथेचाही समावेश केला आहे. यामुळे सातारच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहेच, शिवाय पतीच्या निधनानंतरही न डगमगता धाडशी निर्णय घेणार्‍या व खर्‍या अर्थाने रणरागिणी ठरलेल्या कर्नल स्वाती महाडिक यांची यशोगाथा विद्यार्थ्यांना स्फूर्तीदायी नक्‍कीच ठरेल.

शौर्याचा वारसा असलेल्या  सातारा जिल्ह्याला मोठी ऐतिहासिक, सामाजिक व शैक्षणिक पार्श्‍वभूमी लाभली आहे. सातारा जिल्ह्याने भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात व सामाजिक जडणघडणीत मोठे योगदान दिले आहे. आधुनिक भारतातसुद्धा सातारा जिल्ह्याने आपला वेगळा ठसा उमटवला आहे. यामध्ये सातार्‍याच्या वीरपत्नी स्वाती महाडीक यांच्या यशोगाथेने आणखी भर पडली आहे. सैनिकी परंपरा लाभलेल्या सातार्‍याच्या  स्वाती महाडीक यांच्या गौरवगाथेतून विद्यार्थ्यांना सैनिकी प्रेरणा मिळण्यास मदत होणार आहे  देशभक्ती व राष्ट्रप्रेम याचा आदर्श घालून देण्याचे काम या वीरपत्नीने केले आहे.

मराठीच्या पुस्तकात सातार्‍याचे शहीद कर्नल संतोष महाडीक यांच्या  वीरपत्नी, महाराष्ट्र कन्या स्वाती महाडीक यांचा भावुक वीरपत्नी ते सज्ज वीरांगना असा प्रवास अत्यंत धाडसी, प्रेरक आणि थक्क करणारा आहे. आर्मीचे जीवन ही फक्त नोकरी नाही तर तो जीवन जगण्याचा एक वैशिष्ट्यपूर्ण मार्ग आहे. तेथे शारीरिक क्षमतेपेक्षा मानसिक बल, आत्मबल अधिक महत्वाचे आहे. निग्रही, करारी आणि  धाडसी अशा या रणरागिणीचा जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टीकोन महत्वाचा आहे. पती निधनाचे असीम दु:ख बाजूला ठेवून पतीचे अधुरे स्वप्न पूर्ण करण्याच्या हेतूने भारतमातेची सेवा करण्यासाठी सज्ज झालेल्या या वीरांगणेला सादर प्रणाम, अशी गौरवगाथा मांडण्यात आली आहे.

अभ्यासक्रम  बदलल्यानंतर शाळा सुरू झाल्या तरीदेखील बाजारात पुस्तके मिळत नाहीत, हा आजवरचा अनुभव प्रत्येक पालकाला आहे.पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाने गतवर्षी नववीच्या अभ्यासक्रमात बदल केला होता. मात्र, पुस्तके लवकर मिळाली नाहीत. गतवर्षाचा अनुभव पाहता शिक्षक, विद्यार्थी व पालकांना दहावीच्या सुधारीत पुस्तकांची चिंता होती. पण यंदा शासनाने योग्य नियोजन करून दहावीच्या विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेवून नववीची वार्षिक परीक्षा सुरू होण्यापूर्वीच बाजारात पुस्तके आली आहेत. सातारा शहरातील विक्रेत्यांकडे बदललेल्या नवीन अभ्यासक्रमाची पुस्तके दाखल झाली आहेत.दहावीची सुधारित पाठ्यपुस्तके मिळाल्याने दहावीचे उन्हाळी वर्ग सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र, नवीन अभ्यासक्रमाची पुस्तके ही पालकांच्या  खिशाला थोडी जड ठरणार आहेत. प्रत्येक पुस्तक कमीत कमी 5 रुपये तर जास्तीत जास्त 15 रुपयांनी महाग आहे. गेल्या वर्षापर्यंत दहावीच्या सर्व पुस्तकांचा संच 577 रुपयांना होता,  आता तो 614 रुपयांना उपलब्ध आहे. एका संचामागे  37 रुपयांची वाढ आहे.

Tags : Satara, Success, story,  Veerpatni, 10th, syllabus