Fri, Apr 26, 2019 09:25होमपेज › Satara › विद्यार्थ्यांच्या सह्यांनी फोडले जाणार प्रश्‍नपत्रिकेचे गठ्ठे

विद्यार्थ्यांच्या सह्यांनी फोडले जाणार प्रश्‍नपत्रिकेचे गठ्ठे

Published On: Feb 19 2018 1:20AM | Last Updated: Feb 18 2018 11:20PMसातारा : प्रतिनिधी

दहावी व बारावीच्या परीक्षेदरम्यान  कॉपीवर आळा घालण्यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्यावतीने नियुक्त केलेल्या अतिरिक्त केंद्र संचालकांना एकाच परीक्षा केंद्रावर राहता येणार नाही. तसेच कोणत्या परीक्षा केंद्रावर जायचे आहे हे सुध्दा त्यांना माहित होणार नाही. यावर्षीपासून दोन विद्यार्थ्यांच्या सह्या घेऊन वर्गात विद्यार्थ्यांसमोरच प्रश्‍नपत्रिकेचे गठ्ठे फोडण्यात येणार आहेत.

लवकरच बारावी व दहावी परीक्षा सुरू होत आहे. परीक्षा मंडळातर्फे नियुक्त केलेले अतिरिक्त केंद्र संचालक हे पेपरच्या दिवशी परिरक्षक ज्या ठिकाणी जातील व परिरक्षकांच्या आधीन जी परीक्षा केंद्रे असतात त्या ठिकाणी परिरक्षक त्यांना पाठवतील. त्यामुळे सहपरिरक्षक आपल्याला नेमक्या कोणत्या परीक्षा केंद्रावर पाठविण्यात येणार आहे? याबाबत अनभिज्ञ राहणार आहेत.

एका दिवशी एका परीक्षा केंद्रावर दोन परिरक्षक पाठविण्यात येणार आहेत. पेपर आणण्याची व परत नेवून देण्याची जबाबदारी मात्र सहपरिरक्षक यांचीच राहणार आहे. सहपरिरक्षकाने नेलेल्या प्रश्‍नपत्रिकांचे गठ्ठे शाळेच्या कार्यालयात न फोडता वर्गात विद्याथ्यार्ंसमोर फोडण्यात येणार आहेत. या प्रश्‍नपत्रिकेच्या गठ्ठ्यावर परिरक्षक व सहपरिरक्षकांची स्वाक्षरी असणार आहे. हे प्रश्‍नपत्रिकेचे गठ्ठे वर्गात असणार्‍या पर्यवेक्षक यांच्याकडे देण्यात येणार आहेत.

वर्गात दोन विद्यार्थ्यांची स्वाक्षरी व पर्यवेक्षक यांची स्वाक्षरी घेण्यात येणार आहे.त्यानंतर पर्यवेक्षक प्रश्‍नपत्रिकेचे गठ्ठे फोडून विद्यार्थ्यांना प्रश्‍नपत्रिकेचे वाटप करतील.परिक्षेमध्ये गैरहजर असणार्‍या विद्याथ्यार्ंच्या प्रश्‍नपत्रिका पेपर संपेपर्यंत पर्यवेक्षकांकडे राहणार आहेत. त्यामुळे प्रश्‍नपत्रिका गहाळ झाल्यास पर्यवेक्षक जबाबदार राहणार असल्याची माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी देविदास कुलाळ यांनी दिली.