Sun, Nov 18, 2018 21:49होमपेज › Satara › अ‍ॅपेरिक्षा अपघातात तुळसणमधील विद्यार्थी ठार

अ‍ॅपेरिक्षा अपघातात तुळसणमधील विद्यार्थी ठार

Published On: Apr 26 2018 2:04AM | Last Updated: Apr 25 2018 11:18PMउंडाळे : प्रतिनिधी  

वानरांच्या मागे लागलेले कुत्रे आडवे आल्याने चालकाचा ताबा सुटून अ‍ॅपेरिक्षा पलटी होऊन तुळसण (ता. कराड) येथील सुजित संभाजी वीर (वय 15) हा शालेय विद्यार्थी जागीच ठार झाला. कराड-चांदोली मार्गावरील उंडाळे गावच्या हद्दीत झालेल्या या अपघातात सात जण गंभीर जखमी झाले आहेत.

अनिल शंकर वीर  (36), महादेव बंडू वीर (वय 50), भीमराव शामराव पाटील, रामचंद्र भीमराव चव्हाण, पारुबाई चव्हाण, पूनम माने (वय 20) अशी जखमींची     नावे आहेत. सर्व जखमी तुळसण, विठ्ठलवाडी, पाचुपतेवाडी व उंडाळे परिसरातील आहेत  

तुळसणहून कराडच्या दिशेने निघालेली अ‍ॅपेरिक्षा सकाळी साडेआठच्या सुमारास शिवतेज ढाब्याजवळ आली असता वानरांच्या मागे लागलेले कुत्रे अचानकपणे रिक्षाच्या आडवे आले. यावेळी कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात चालकाने ब्रेक मारल्याने अ‍ॅपेरिक्षा पलटी झाली. यावेळी चालकाशेजारी बसलेल्या सुजित वीर याच्या डोक्याला जबर मार लागला. तसेच अ‍ॅपेरिक्षाखाली सापडल्याने तो जागीच ठार झाला. तो दहावीच्या जादा तासासाठी निघाला होता, असे पोलिसांनी सांगितले.

तर अ‍ॅपेरिक्षातील अन्य लोक जखमी झाले. सर्व जखमींना उपचारासाठी कराडच्या कृष्णा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताची नोंद कराड तालुका पोलिसात झाली असून अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक साबळ तपास करत आहेत.