Fri, Nov 16, 2018 21:55होमपेज › Satara › विद्यार्थ्याने चोरली दुचाकी 

विद्यार्थ्याने चोरली दुचाकी 

Published On: Mar 13 2018 1:43AM | Last Updated: Mar 13 2018 1:43AMसातारा : प्रतिनिधी

दुचाकीवर मजा करत फिरता यावे, यासाठी सातार्‍यातील एका नामांकित इंग्लिश मीडियम स्कूलमधील अल्पवयीन मुलाने चक्‍क दुचाकी चोरल्याचे निदर्शनास आले आहे. विशेष म्हणजे, हा विद्यार्थी सध्या दहावीची परीक्षा देत आहे. त्यामुळे कारवाई करण्याबाबत पोलिसांचीही कोंडी झाली असून परीक्षा संपल्यानंतर या विद्यार्थ्यावर कारवाई होणार असल्याचे सांगण्यात आले. 

सोमवारी दुपारी वाहतूक विभागाचे पोलिस शहरात गस्त घालत होते. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात एका दुचाकीवरुन संबंधित अल्पवयीन मुलगा येत असताना पोलिसांनी त्याला अडवले. त्याच्याकडे लायसनची मागणी करण्यात आली. दहावीचा पेपर असल्यामुळे मला जावू द्या, अशी विनंती त्याने पोलिसांकडे केली. मात्र, पोलिसांना त्याच्या वर्तनाबाबत  संशय आला. पोलिसांनी दंड भरावा लागेल असे सांगताच त्याने 500 रुपयांची नोट काढताच त्यांची शंका अधिकच बळावली. दुचाकीबाबत पोलिसांनी चौकशीला सुरुवात करताच संशयित मुलगा घाबरला व त्याने दुचाकी चोरली असल्याची धक्‍कादायक माहिती दिली. 

मुलगा अल्पवयीन असून व दहावीचे पेपर असल्याचे समोर आल्याने त्याला नोटीस देवून नंतर कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.  पोनि नारायण सारंगकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार सोमनाथ शिंदे व सुरज रेळेकर यांनी कारवाई केली आहे.