Fri, May 24, 2019 06:25होमपेज › Satara › शासनाच्या निर्णयाचे जिल्ह्यात जोरदार स्वागत

शासनाच्या निर्णयाचे जिल्ह्यात जोरदार स्वागत

Published On: May 30 2018 2:23AM | Last Updated: May 29 2018 11:56PMसातारा : प्रतिनिधी

बर्‍याच वर्षापासून प्रलंबित असलेल्या सातारा येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला कृष्णा खोर्‍याची जागा देण्याचा महत्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला असल्याने विद्यार्थी,  पालकांसह अवघ्या जिल्हावासियांनी या निर्णयाचे स्वागत केले. दरम्यान, जिल्ह्यातील राष्ट्रवादी, भाजपा, शिवसेना व काँग्रेस या पक्षांच्या पदाधिकार्‍यांनीही मेडिकल कॉलेजचे श्रेय घेताना सरकारच्या निर्णयाचे स्वागत केले. भाजपाच्यावतीने पोवईनाक्यावर साखर वाटप करून आनंदोत्सव साजरा केला.

जागेच्या प्रश्‍नावरून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रश्‍न गेल्या काही वर्षापासून  शासनदरबारी प्रलंबित होता. मात्र मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला 25 एकर जागा कायमस्वरूपी  महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाची जागा देण्याबाबतचा महत्वपुर्ण निर्णय घेण्यात आला. या निर्णयाचे जिल्ह्यात उत्साहात स्वागत करण्यात आले. विशेषत: विद्यार्थी व नागरिकांनी शासनाला धन्यवाद दिले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामुळे गरीब, गरजु रूग्णांना चांगल्या वैद्यकीय सुुविधा उपलब्ध होणार आहेत. याशिवाय गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांनाही चांगल्या संधी प्राप्त होणार आहेत. मेडीकलसाठी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना अन्य जिल्ह्यात जावून प्रवेश घेण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत होती मात्र या कॉलेजमुळे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना त्याचा चांगला फायदा होणार आहे.

दरम्यान, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला कायमस्वरूपी जागा देण्याचा, तसेच विठ्ठल रूक्मिणी मंदीर समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा देण्याचा  निर्णय राज्य शासनाने घेतला असल्याने सातारा शहर भारतीय जनता पार्टीच्यावतीने पोवईनाक्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले त्यानंतर नागरिकांना साखर वाटप करून  आनंद व्यक्त केला.

यावेळी जि.प. सदस्य दिपक पवार, नगरसेवक मिलींद काकडे, विजय काटवटे, धनजंय जांभळे,सागर पावशे, विकास गोसावी,सचीन मोहिते, आप्पा कोरे, सचीन घाडगे, अमोल कांबळे, जयदीप ठुसे, रवी आपटे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.