Fri, May 24, 2019 06:24होमपेज › Satara › साताऱ्यात एस.टी कंडक्टरला मारहाण

साताऱ्यात एस.टी कंडक्टरला मारहाण

Published On: Apr 13 2018 7:50PM | Last Updated: Apr 13 2018 7:47PMसातारा : प्रतिनिधी

सातारा मध्यवर्ती बसस्थानकामध्ये एसटीत प्रवेश करून  वडापगिरी  करणार्‍याला कंडक्टरने हटकल्यानंतर कंडक्टरलाच शिवीगाळ, दमदाटी करुन मारहाण करण्याचा प्रकार घडला आहे. याबाबत किरण बिभीषण शिंदे (वय 22, रा.करंजे) याच्याविरुध्द शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

एसटी वाहक सुभाष किसन भोसले (वय 56, रा.मुंबई) यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून, ते नेहरुनगर, मुंबई येथील एसटी डेपोमध्ये सध्या कार्यरत आहेत. याबाबत अधिक माहिती अशी, सुभाष भोसले हे दुपारी सातारा-दादर ही एसटी घेऊन दादरला निघाले होते. दुपारी सव्वाएक वाजण्याच्या सुमारास ते एसटीमध्ये आल्यानंतर एक अनोळखी युवक एसटीमध्ये बसलेल्या प्रवाशांना खाली उतरण्यास सांगून बाहेर उभ्या असलेल्या खासगी वाहनात बसण्यास सांगत होता.

सुभाष भोसले यांच्‍या हा प्रकार लक्षात आल्‍यानंतर त्‍यांनी त्‍या युवकाला एसटीतून खाली उतरण्याची सूचना केली. त्‍यानंतर या युवकाने भोसले यांना शिवीगाळ व दमदाटी करत मारहाण करणयास सुरुवात केली. अचानक घडलेल्‍या या प्रकाराने एसटीमधील प्रवासी घाबरले व त्‍यांनी आरडाओरडा सुरु केला. संशयित शिंदे हा भोसले यांना शिवीगाळ करून मारहाण करत असताना परिसरात बघ्यांची गर्दी उसळली होती. यावेळी एसटी  डेपो पोलिस चौकीतील पोलिस हवालदार अरुण दगडे व केतन शिंदे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली.

घटनेची माहिती घेऊन पोलिसांनी संशयित किरण शिंदे याला ताब्यात घेतले. यावेळी एसटी डेपोतील इतर कर्मचारी मोठया संख्येने जमले. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून जमावाला पांगवले. कंडक्टर सुभाष भोसले यांनी संशयित किरण शिंदे याच्याविरुध्द तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी मारहाण, शिवीगाळ, दमदाटी व शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला.

Tags : ST conductor , Satara, satara news