Sat, Nov 17, 2018 07:55होमपेज › Satara › मराठा समाज बांधवांचा आज ठिय्या

मराठा समाज बांधवांचा आज ठिय्या

Published On: Jul 24 2018 1:09AM | Last Updated: Jul 23 2018 11:40PMकराड : प्रतिनिधी

राज्य शासनाकडे वारंवार मागणी करूनही मराठा समाजाला न्याय मिळालेला नाही त्यामुळेच सकल मराठा समाज बांधवांनी परळी (बीड) येथे ठिय्या आंदोलन सुरु केले आहे. या आंदोलनास पाठींबा दर्शविण्यासाठी कराड तालुक्यात सकल मराठा समाज बांधवांकडून मंगळवार, 24 जुलै रोजी ठिय्या आंदोलन केले जाणार आहे. मराठा बांधवांनी स्वयंशिस्त पाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

कराड तालुका सकल मराठा समाज बांधवांचे शनिवारी कराडच्या शासकीय विश्रामगृहात बैठक झाली होती. या बैठकीत लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचे निश्‍चित करण्यात आले होते. दोन वर्षांपूर्वी सातारा येथे काढलेल्या मोर्चात कराड तालुक्यातील लाखो समाज बांधवांनी ज्याप्रमाणे स्वयंशिस्त पाळली होती. त्याप्रमाणेच स्वंयशिस्त पाळत या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

मंगळवारी सकाळी 9.30 वाजता कराडमधील दत्त चौकात एकत्र येऊन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास मराठा समाज बांधव अभिवादन करणार आहेत. तेथून पुढे कराड तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलनास प्रारंभ होणार आहे. त्यामुळेच सकाळी 9.30 वाजता तालुक्यातील समाजबांधवांनी कराडमधील दत्त चौकात एकत्र यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.