Fri, Jun 05, 2020 11:38होमपेज › Satara › सोशल मीडियावरील प्रचाराला कडक निर्बंध

सोशल मीडियावरील प्रचाराला कडक निर्बंध

Published On: Oct 01 2019 2:03AM | Last Updated: Oct 01 2019 12:32AM
सातारा : प्रतिनिधी
लोकसभेची पोटनिवडणूक व विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली असून प्रचारासाठी यावेळी कडक  निर्बंध लागू करण्यात आले आहे. त्यामुळे जे जे उमेदवार व्हॉटस्अप ग्रुप, फेसबुक,  ट्विटर, इस्टाग्राम, यू ट्यूब याद्वारे परवानगी न घेता सैराट प्रचार  करत आहेत. त्यांच्यावर कारवाईची टांगती तलवार राहणार आहे. त्यामुळे सोशल मीडियाद्वारे प्रचार करणे या उमेदवारांना व त्यांच्या कार्यकर्त्यांना महागात पडण्याची चिन्हे आहेत. 

सातारा लोकसभेची पोटनिवडणूक व विधानसभेची सार्वत्रिक निवडणूक जाहीर झाल्याने जिल्ह्यातील राजकीय वातावरण पूर्णत: ढवळून गेले आहे. प्रमुख पक्षांच्या इच्छुक उमेदवारांनी प्रचाराचे रान तापवायला सुरूवात केली आहे. मात्र, प्रचारासाठी निवडणूक आयोगाने कडक निर्बंध लादले आहेत. विशेषत: सोशल मीडियावरील प्रचाराकडे  निवडणूक आयोग बारकाईने लक्ष ठेवून आहे.

अनेक उमेदवारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचाराची राळ उडवली आहे. सद्यस्थितीत त्यांना ही गंमत वाटत असली तरी हा प्रचार चांगलाच अंगलट येण्याची चिन्हे आहेत. सोशल मीडियावरील प्रचाराच्या अनुषंगाने लक्ष ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासह प्रत्येक विधानसभा मतदार संघात आयोगाची टीम कार्यरत आहे. जे इच्छुक उमेदवार सोशल मीडियाचा वापर करत आहेत त्यांच्यावर करडी नजर ठेवली जात आहे. 

अनेक उमेदवार सोशल मीडियाद्वारे विविध आवाहने करत आहेत, वेगवेगळी डिझाईन्स, पोस्टर्स, जाहिराती, प्रचाराचे फोटो, व्हिडिओज, भेटीगाठी सगळे सोशल मीडियावर व्हायरल करत आहेत. त्यासाठी प्रशासनाकडून कोणतीही परवानगी घेतली गेलेली नाही. त्यामुळे प्रशासनाही अशा ग्रुपवर कारवाई करणार आहे. 

सोशल मीडियावर प्रचार करण्याबाबत निवडणूक आयोगाने नियमावली निश्चित केली आहे. मात्र अनेक राजकीय पक्षांचे इच्छुक उमेदवार व त्यांचे  कार्यकर्ते रान मोकळे असल्यासारखे व्हॉटस्ग्रुप तयार करून त्याद्वारे प्रचार करत आहेत. फेसबुकचाही त्यासाठी मोठ्या प्रमाणात वापर सुरू आहे. त्यांचे कार्यकर्तेही उराला वाळू लावून प्रचाराचा धडाका  उडवत आहेत. 

मात्र, अशा प्रचारासाठी नियमानुसार संबंधीत मीडिया सेल व निवडणूक आयोगाची रितसर परवानगी घेण्याची गरज आहे.  तसे न करता सोशल मीडियावर प्रचार करणार्‍या संबंधीत इच्छुक उमेदवारावर तसेच  त्यांच्या कार्यकर्त्यांवरही  कडक कारवाई होवून गुन्हे दाखल होण्याची चिन्हे आहेत. 

सोशल मीडियावरील प्रचाराची होणार तपासणी

अनेक इच्छुक उमेदवारांचे कार्यकर्ते उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वीच मतदारांना मत देण्याचे आवाहन करत आहेत. परवानगीविना केलेला हा प्रचार बेकायदेशीर ठरणार आहे. आचारसंहिता भंग करणारा हा प्रकार असून संबंधीतांवर कठोर कारवाई होणार आहे.

उमेदवारांना आपल्या अर्जातच कोणकोणत्या सोशल मीडियावर व कशा पद्धतीने  प्रचार करणार आहे याची माहिती द्यावी लागणार आहे. यावर नजर ठेवण्यासाठी सायबर पोलिस ठाणे, प्रत्येक विधानसभा मतदारसंंघ जिल्हा पातळीवर मीडिया सेल लक्ष ठेवणार आहे. सोशल मीडियावर बल्क मेसेज केल्यास त्यांची गणना केली जाणार आहे. शिवाय प्रचारातील मुद्दा आचारसंहितेला अनुसरून आहे किंवा नाही याचीही तपासणी करण्यात येणार आहे.

या निवडणुकीचे कामकाज विधानसभा मतदारसंघनिहाय चालणार असल्याने संबंधित निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी भरारी पथकांची निर्मितीही केली आहे. आचारसंहिता नियंत्रण कक्षही स्थापन करण्यात आला असून सोशल मीडियावरील प्रचारावरही नियंत्रण ठेवले जात आहे.