Mon, Aug 19, 2019 01:15होमपेज › Satara › ठिय्या आंदोलनादरम्यानच तुफान

ठिय्या आंदोलनादरम्यानच तुफान

Published On: Jul 26 2018 1:39AM | Last Updated: Jul 26 2018 1:27AMसातारा : प्रतिनिधी

गेल्या वर्षभराच्या कालावधीत मराठा समाजाने राज्यभरात 58 मूक मोर्चे काढले. यानंतरही शासनाने याची दखल घेतलेली नाही. वारंवार टोलवाटोलवी केल्याने मराठा समाज चवताळला आहे. त्यामुळे आता ठोक मोर्चा काढणार आहे. मराठ्यांचा आता संयम संपला आहे. त्यामुळेच आता केवळ ठोक मोर्चावरच थांबणार नाही. आता आर या पारची लढाई निर्णायक टप्प्यावर आली असून मागण्या मान्य झाल्याशिवाय मागे हटायचे नाही, असा वज्रनिर्धार राजधानी सातार्‍यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या ठिय्या आंदोलनात मराठा समाजाने केला. 

ऐतिहासिक गांधी मैदानापासून निघालेल्या मराठा समाजाच्या ठोक मोर्चाची जिल्हाधिकारी कार्यालयावर सांगता झाल्यानंतर  ठिय्या आंदोलनाला सुरूवात झाली. मराठा क्रांती मोर्चाच्या जिल्हा समन्वय समितीच्या पदाधिकार्‍यांसह आंदोलकांनी प्रवेशद्वारातच ठिय्या टाकला. यावेळी पूर्ण परिसरात मराठ्यांची  तोबा गर्दी उसळली.  ‘एक मराठा, लाख मराठा’, ‘एकदाच घुसणार भगवा दिसणार’, ‘जय भवानी जय शिवाजी’, ‘तुमचं आमचं नात काय, जय जिजाऊ जय शिवराय’ अशा गगनभेदी घोषणांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणून गेला. 

मोर्चेकरी कार्यालय परिसरात आल्यानंतर कमालीचे संतप्‍त झाले होते. युवकांनी सुमारे 15 ते 20 मिनिटे रस्त्यावर आक्रमकपणे घोषणाबाजी केली. यानंतर मराठा क्रांती समन्वयक समितीच्यावतीने जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांना निवेदन देण्यात आले. यानंतर समितीच्या पदाधिकार्‍यांनी मोर्चेकर्‍यांना शांत राहण्याचे आवाहन केले.

मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे. मराठा समाजाने आत्तापर्यंत शांततेच्या मार्गांनी राज्यभर आंदोलने केली तरी भाजप सरकारने मराठ्यांना आरक्षण देण्याचा निर्णय जाहीर केलेला नाही. सरकारच्या भुमिकेमुळे आज मराठा समाज राज्यभर रस्त्यावर आक्रमकपणे उतरलेला आहे.  आता तो कुणाचेही ऐकणार नाही.  त्यामुळे सत्ताधार्‍यांनी सावध व्हावे, असा इशाराही यावेळी देण्यात आला. 

काकासाहेब शिंदे या युवकाने बलिदान दिले. मराठ्यांनो या युवकाचे बलिदान आता व्यर्थ जावू देवू नका. आरक्षणासाठी आता आरपारची लढाई लढलीच पाहिजे, असा इशारा देण्यात आला. ठिय्या आंदोलन सुरू असताना जमाव एवढा प्रक्षुब्ध होता की कोणाचेही ऐकायच्या मनस्थितीत नव्हता.  जोरदार घोषणाबाजींनी आंदोलकांनी ठिय्या आंदोलनातच तुफान माजवले. त्यामुळे आ. शिवेंद्रराजे भोसले, आ. शशिकांत शिंदे यांनाही भाषण करताना अनेकदा अडथळे आले. आंदोलकांच्या आक्रमकतेमुळे  समितीच्या पदाधिकार्‍यांनी ठिय्या आंदोलनातून आंदोलकांंना  शांततेचे आवाहन केले. एकेका गटाला बाहेर जाण्याच्या सूचना केल्या. जमावातील काही गट महामार्गाच्या दिशेने गेले तर काही शहराच्या दिशेने. याच कालावधीत महामार्गावर गडबड झाल्याचे समजल्यानंतर ठिय्यातील आंदोलक महामार्गाकडे गेले. महामार्गावरची तणावपूर्ण परिस्थिती लक्षात घेता जिल्हा पोलिस प्रमुखांनी ठिय्या आंदोलन थांबवण्याच्या सूचना केल्या. त्यामुळे सातारा शहरातील कायदा सुव्यवस्था लक्षात घेता व ठिय्या आंदोलनातील आंदोलकांना बदनाम करण्याच्या हेतूने काही अपप्रवृत्ती सरसावल्या असल्याचे लक्षात घेता ठिय्या आंदोलन विसर्जित करण्यात आले. 

अजूनही वेळ गेलेली नाही, हे सरकारने लक्षात घ्यावे. मराठा आंदोलनाला वेगळे स्वरूप येण्याआधी परिस्थिती लक्षात घेवून मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणाचा निर्णय घ्यावा. मराठ्यांनो, सरकारने फेकलेल्या तुकड्यांवर किती जगायच. हीच वेळ आहे, आरक्षण मिळाल्याशिवाय आता मागे हटू नका.
- आ. शिवेंद्रराजे भोसले

छ. शिवाजी महाराजांच्या काळापासूून जिल्ह्यात इतिहास  उभा करण्याचे काम सुरू आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी सातारा जिल्ह्याने क्रांती घडवावी. जिल्हा बंदच्या हाकेनंतर मराठ्यांंची ताकत एकाच दिवसात दिसून आली आहे. आरक्षणाचा निर्णय लवकर न घेतल्यास परिणाम भोगावे लागतील.  
- आ. शशिकांत शिंदे

आ. जयकुमार गोरेही ठिय्या आंदोलनात 
मराठा आरक्षणाच्या लढ्यात आ. जयकुमार गोरे यांनी आग्रही भुमिका घेतली आहे. सातार्‍यात बुधवारी झालेल्या मराठा समाजाच्या आंदोलनासाठी ते स्वत: आवर्जून उपस्थित राहिले होते. ठिय्या आंदोलनात आ. शिवेंद्रराजे भोसले व आ. शशिकांत शिंदे याच्या बरोबरीने आ. जयकुमार गोरेही आंदोलनस्थळी उपस्थित होते. आ. गोरे यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी विधानसभेत आवाज उठवला होता. विधानसभेत आरक्षणाचा पाठपुरावा केल्यानंतर बुधवारी मराठा समाजाच्या आंदोलनात त्यांनी सहभाग घेतल्याने याप्रश्‍नी त्यांची असलेली तळमळ प्रकर्षाने जाणवली.