होमपेज › Satara › शेतकर्‍यांविरोधातील सरकार उलथण्यासाठी पक्षसंघटन भक्कम करा : अजित पवार

सरकार उलथण्यासाठी पक्षसंघटन भक्कम करा : अजित पवार

Published On: Jan 05 2018 1:26AM | Last Updated: Jan 05 2018 1:26AM

बुकमार्क करा
औंध : वार्ताहर

राज्यातील सरकारने लोकांची विश्‍वासर्हता गमावली आहे. नोटाबंदीसारख्या निर्णयातून लाभ मिळण्याचे सोडा पण जनतेची पिळवणूक जास्त झाली आहे. धनगर, मराठा आरक्षणाबाबत शासनाने लोकांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. दिलेली आश्‍वासने शासनाने पाळली नाहीत त्यामुळे जनतेचा भ्रमनिरास झाला आहे. शेतकर्‍यांच्या विरोधातील हे सरकार उलथून टाकण्यासाठी तळागाळापर्यंत पक्षाचे संघटन भक्कम करावे आणि जास्तीत जास्त सभासद नोंदणी करावी, असे आवाहन आ. अजित पवार यांनी केले.

औंध येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सभासद नोंदणी कार्यक्रमात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी माजी आमदार प्रभाकर घार्गे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने,  शिवाजीराव सर्वगोड, संदीप मांडवे, सी एम पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.जिल्हा परिषद, पंचायत समितीची सत्ता लोकांनी मोठ्या विश्‍वासाने दिली आहे. केलेली कामे लोकांपर्यंत पोहोचवा. सामान्यांना पक्षाचे सभासदत्व देऊन तळागाळापर्यंत राष्ट्रवादी पक्ष भक्कम करा, असेही ते म्हणाले.

माजी आमदार प्रभाकर घार्गे म्हणाले, सभासद नोंदणी शुभारंभ झाला आहे. खटाव तालुक्यातून विक्रमी नोंदणी करुन राष्ट्रवादीच्या पाठीशी पाठबळ उभे करुया. यावेळी सुनिल माने यांनी मनोगत व्यक्त केले. हणमंतराव शिंदे यांनी प्रास्तविक केले. बाळासाहेब पोळ, भिकू कंठे,  सुनील नेटके, राजेंद्र माने, उपस्थित होते.