Wed, Jul 24, 2019 12:35होमपेज › Satara › विलासपूरमध्ये स्ट्रीट लाईट बंद, चोर्‍या सुरू

विलासपूरमध्ये स्ट्रीट लाईट बंद, चोर्‍या सुरू

Published On: Aug 14 2018 1:05AM | Last Updated: Aug 14 2018 12:13AMकोडोली : शिवाजी कदम

सातारा शहरालगतच्या विलासपूरमध्ये चोरट्यांनी चोरीचा नवा फंडा अवलंबला असून  रात्रीच्या वेळी स्ट्रीट लाईट बंद करून बंद असलेली घरे फोडली जात आहेत. सलग चार दिवस स्ट्रीट लाईट बंद करून ‘डाव’ साधल्याचा प्रकार समोर आला असून त्यातून सगळीच ‘साफसफाई’ करण्याची मोहीम चोरट्यांनी फत्ते केली आहे. दरम्यान, या चोरीसाठी लहान मुलांचाही वापर करण्यात येत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.

विलासपूर ग्रामपंचायत हद्दीत कोयना सन्मित्र गृहनिर्माण संस्था असून या संस्थेमधील सर्व बंगले अजिंक्यतारा किल्ल्याच्या एका डोंगर रांगेलगत पाटबंधारे खात्यातील कर्मचार्‍यांनी लाखो रुपयांचे कर्जे काढून बांधले आहेत. संस्थेचा कारभारही अत्यंत नियमबद्ध शांतताप्रिय, शिस्तप्रिय चालला असून जिल्ह्यातील गृहनिर्माण संस्थांसाठी तो आदर्शवत ठरला आहे.  या संस्थेच्या पूर्वेला सहजीवन सोसायटी तर पश्‍चिमेला नवीन पोलिस वसाहत आहे तर दक्षिणेला डोंगररांग आहे. असे सुरक्षा कवच असलेल्या उच्चभ्रू लोकांच्या सोसायटीमध्ये दरवर्षी जबरी चोर्‍यांचे अजब प्रकार घडत आहेत. दरवर्षी चोरीचा नवा फंडा वापरून सुफडा साफ केला जात असल्याने  पोलिसदादांपुढे आव्हान उभे राहिले आहे. चोरीच्या अशा अनेक घटना घडल्या आहेत. मात्र, आतापर्यंत चोरटे सापडले नाहीत.  श्‍वानपथक आले, हाताचे, बोटाचे ठसे नेले. परंतू चोरटे सापडत नाहीत. शोध सुरू आहे हे एकच उत्तर पोलिसदादांकडून ऐकायला मिळत आहे.

कोयना सन्मित्र सोसायटीमध्ये प्लॉट नंबर 59 मध्ये जबरी चोरी झालेल्या बंगल्याचे मालक अनिल खरे यांनी चोरट्यांच्या नवनव्या फंड्याबाबत ऑन दि स्पॉटची खरी माहिती अत्यंत धक्कादायक असल्याचे त्यांनी सांगितले.  ते म्हणाले, आम्ही सहकुटुंब 31 जुलैपूर्वी बंगला बंद करून कामानिमित्त पुणे येथे नातेवाईकांकडे 8 ते 15 दिवसांसाठी गेलो होतो. दरम्यानच्या काळात 31 जुलै ते 4 ऑगस्टच्या दरम्यान सलग चार रात्री चोरट्यांनी आमच्या घरातील सर्व साहित्यांचा सुफडा साफ केल्याचे दिसून आले. 

चोरट्यांचा गृहप्रवेशही अत्यंत मनोरंजक आहे. चोरट्यांनी डोंगरच्या बाजूकडील बाथरूमची खिडकीची काच फोडून गज वाकवून चोरी करण्यासाठी लहान मुलाला आत सोडल्याचे निदर्शनास येत आहे. संबंधीत लहान मुलाने फोडलेल्या खिडकीच्या वाटेतून बाहेर जातील एवढ्या आकाराची घरातील सर्व भांडी, सर्व नवीन जुनी कपडे, दीड किलो चांदीचे ताट, दागिने, काही कागदपत्रे नेल्याचे दिसून येते. तसेच चोरट्यांनी घरातील सिलेंडर, गॅस शेगडी, ओव्हन, इलेक्ट्रॉनिक वस्तू, मोठ्या आकाराचा टी.व्ही. नेण्यासाठी बंगल्याच्या पुढील दाराचे कुलूप तोडून मोठे व जड साहित्य नेण्यासाठी तो मार्ग अवलंबला असल्याचे निदर्शनास येत आहे. चोरट्यांनी संबंधीत बंगल्यात चोरी करण्यासाठी बंगल्याचे लाईट कनेक्शन तोडल्याचे दिसून येत आहे. या चोरीच्या घटनेच्या वेळी चोरटे त्याच सोसायटीच्या कार्यालयाशेजारी स्ट्रीट लाईटच्या उघड्या डी.पी.मधून रात्रीचे 12 ते पहाटे 4 पर्यंत लाईट घालवत असत व जाताना पहाटे 4 वाजता स्ट्रीट लाईट लावत असल्याचे स्थानिक लोकांचे म्हणणे आहे.

अनिल खरे यांच्या घरीही चोरट्यांनी डल्ला मारला आहे. त्यांनी सांगितले की, गेल्या वर्षी माझ्या शेजारील बंद बंगलाही चोरट्यांनी फोडला होता. त्याचा तपास अद्याप लागलेला नाही. त्यामुळे चोरटे निर्ढावले असून अधूनमधून ‘साफसफाई’ केली जात आहे. 

चोरटे आसपासच्या भागातील माहितगार असावेत. चोरट्यांसोबत लहान मुलही असण्याची शक्यता असून त्यांची संख्या सुमारे  5 असण्याची शक्यता स्थानिकांनी व्यक्‍त केली आहे. सलग चार रात्री 12 ते पहाटे चारपर्यंत स्ट्रीटलाईट बंद होत होती. याच कालावधीत चोरीच्या घटना घडल्या आहेत.