Sun, Jul 21, 2019 01:30होमपेज › Satara › महाबळेश्‍वरमध्ये स्ट्रॉबेरी संशोधन केंद्राची उभारणी करणार : सदाभाऊ खोत

महाबळेश्‍वरमध्ये स्ट्रॉबेरी संशोधन केंद्राची उभारणी करणार : सदाभाऊ खोत

Published On: Apr 30 2018 1:46AM | Last Updated: Apr 29 2018 10:46PMमहाबळेश्‍वर : वार्ताहर 

महाबळेश्‍वर तालुक्याचे स्ट्रॉबेरी हे प्रमुख पीक आहे. येथील स्ट्रॉबेरी ही देशाबरोबर जागतिक बाजारपेठेत जाते. या पिकाला आता महत्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे महाबळेश्‍वरमध्ये लवकरच स्ट्रॉबेरी संशोधन केंद्राची उभारणी करण्यात येणार आहे. याचे उद्घाटन मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करणार असल्याची माहिती  कृषी फलोत्पादन पणन व पाणी पुरवठा राज्य मंत्री  ना. सदाभाऊ खोत यांनी दिली.

तळदेव, ता. महाबळेश्‍वर येथे वसुंधरा स्वयंरोजगार सेवा उद्योग संस्थेच्यावतीने शेतकर्‍यांबरोबर चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आयोजित समारंभात ना. खोत बोलत होते. यावेळी वसुंधरा संस्थेचे अध्यक्ष संजय जंगम, उपाध्यक्ष संतोष जाधव, गणेश उतेकर, किसनराव जाधव, शैलेश जाधव व मान्यवर उपस्थित होेते. ना. खोत म्हणाले, स्ट्रॉबेरी फळ प्रक्रिया केंद्राची उभारणी करण्याची गरज आहे. त्यामुळे रोजगार मिळेल व अर्थकारण बदलेल.  कृषी पर्यटनाला चालना देण्याची आवश्यकता असून या माध्यमातून रोजगार उपलब्ध होऊ शकतो. त्यासाठी शासन अनेक योजना घोषित करत आहेत. मात्र, अधिकार्‍यांच्या भोंगळ कारभारामुळे शेतकर्‍यांपर्यंत या योजना पोहचतच नाही, अशी खंत ना. खोत यांनी व्यक्त केली.

या भागातील लोकप्रतिनिधींचे या कोयना सोळशी व कांदाटी विभागाच्या विकासाकडे नेहमी दुर्लक्ष होते. तालुक्यातील काही गावांचाच विकास करण्याकडे यांचे अधिक लक्ष असते. देवसरे येथे छोटे धरण बांधण्याची आवश्यकता आहे. यामुळे या भागातील शेती ओलिता खाली येईल व या भागातील शेतकरी यांची अनेक वर्षांची मागणी पुर्ण होईल, असे उतेकर यांनी ना. खोत यांच्या निदर्शनास आणून दिले. यावेळी शैलेश जाधव, किसनराव जाधव, राजेश घाडगे यांनी मनोगत व्यक्त केले. 

संजय जंगम यांनी प्रास्ताविक केले. या कार्यक्रमात शेतकर्‍यांना अनुदानातून ट्रॅक्टर प्रदान करण्यात आले. जिल्हा कृषी अधिकारी सुनिल बोरकर, चांगदेव बागल, तहसिलदार रमेश शेंडगे, वनक्षेत्रपाल रणजित गायकवाड, पोनि दत्तात्रय नाळे, बाजीराव संकपाळ व शेतकरी उपस्थित होते.