Wed, Jul 17, 2019 20:39होमपेज › Satara › महाबळेश्‍वर, पाचगणीचा पाणीपुरवठा बंद

महाबळेश्‍वर, पाचगणीचा पाणीपुरवठा बंद

Published On: May 08 2018 1:55AM | Last Updated: May 08 2018 1:17AMमहाबळेश्‍वर : वार्ताहर

वेण्णा धरणाच्या बाजूने जाणार्‍या पर्यायी रस्त्यावरील पुलाचे बांधकाम सुरू करण्यात आले आहे. कामाच्या पहिल्याच दिवशी महाबळेश्‍वर व पाचगणी या दोन शहरांना पाणीपुरवठा करणारी मुख्य पाईपलाईन तुटल्याने या दोन्ही शहरांचा पाणीपुरवठा बंद झाला आहे. पाणीपुरवठा सुरळीत होईपर्यंत या दोन्ही शहरांना आता टँकरने पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याची माहिती मुख्याधिकारी अमिता दगडे-पाटील यांनी दिली. 

महाबळेश्‍वर शहर व परिसरात होत असलेली वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी वेण्णा धरणाच्या डाव्या बाजूने पेटीट रस्त्याच्या पर्यायी रस्त्याचे काम सुरू करण्यात आले आहे. वेण्णा धरणाच्या सांडव्यापासून काही अंतरावर पूल बांधण्यात येणार आहे. या पुलाचे काम सुरू कारण्यासाठी खोदकाम करण्यास सोमवारी सुरुवात झाली. ज्या ठिकाणी काम सुरू झाले तेथून काही अंतरावर वेण्णा धरणातून महाबळेश्‍वर व पाचगणी या दोन शहरांसाठी प्राधिकरणाची पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन जाते. या पाईपलाईनपासून  काही अंतरावर खोदकाम सुरू होताच मातीचा भाला मोठा भराव खाली कोसळला व त्या मध्ये पाणी पुरवठा करणारी पाईप लाईन तुटून खाली कोसळली. ही पाईप लाईन तुटल्याने महाबळेश्‍वर व पाचगणीचा पाणी पुरवठा सोमवार सकाळपासून बंद पडला आहे. जोपर्यंत ही या पाईपलाईनच्या दुरूस्तीचे काम होत नाही. तोवर पाणी पुरवठा खंडीतच राहणार आहे. 

या प्रकारची माहिती मिळताच नगराध्यक्षा सौ. स्वप्नाली शिंदे, मुख्याधिकारी सौ. अमिता दगडे-पाटील, नगरसेवक रवींद्र कुंभारदरे, नगरसेविका स्नेहल जंगम, सुनीता आखाडे, आफरीन वारूणकर, बांधकाम विभागचे महेंद्र पाटील, प्राधिकरणाचे उपअभियंता आर. के. लवंगारे यांनी पाहणी केली. यावेळी सौ. शिंदे यांनी सध्या उन्हाळी हंगाम असून पाणी टंचाई भासू नये यासाठी पुलाचे काम थांबवून पाईपलाईनचे काम युध्द पातळीवर सुरू करण्याची मागणी केली. सध्याची पाणी पुरवठ्याची स्थिती लक्षात घेता पाचगणीला दिवसाआड तर महाबळेश्‍वरच्या पाणी पुरवठा वेळेत कपात करण्यात आली आहे.

 

Tags : satara, district, Mahabaleshwar, Panchgani, water supply