Fri, Jul 19, 2019 14:02होमपेज › Satara › चोरलेली कार जीपीएस प्रणालीमुळे सापडली

चोरलेली कार जीपीएस प्रणालीमुळे सापडली

Published On: Feb 27 2018 1:56AM | Last Updated: Feb 26 2018 11:14PMसातारा : प्रतिनिधी

मुंबई येथून भाड्याने आणलेली कार सातार्‍यातून चोरून नेणार्‍या टोळीचा शाहूपुरी पोलिसांनी पर्दाफाश करून एकाला अटक केली. भाडेकरू असणार्‍या एका संशयितालाच पोलिसांनी अटक केली असून कार जप्‍त केली आहे. दरम्यान, जीपीएस प्रणालीद्वारे पोलिसांनी या गुन्ह्याची उकल केली आहे. सय्यद अब्दुल महमद खाजा साजीद (रा. मेहबुबनगर, गुलबर्गा, कर्नाटक) याला पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी कारचालक मोहन महादेव पवार (वसई, पालघर) यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, एमएच 01 सीआर 5859 ही क्रिस्टा कार सौ. सीमा अंबवणे (रा. मुंंबई) यांच्या मालकीची आहे. तक्रारदार मोहन पवार हे या कारवर बदली चालक असून दि. 23 रोजी ते कार घेऊन यातील दोन्ही संशयितांचे भाडे घेऊन मुंबईतून गोवा येथे निघाले होते. कारमधून प्रवास सुरू झाल्यानंतर संशयितांनी कोल्हापूर मार्गे गोव्याला जायचे सांगितले. महामार्गावर असतानाच सातारा येथे मुक्‍काम करून नंतर पुढे जाऊ या, असे संशयितांनी     सांगितल्याने सातारा येथील महामार्गावरील एका हॉटेलवर ते मुक्‍कामासाठी थांबले.

तक्रारदार चालक मोहन पवार हे झोपले असल्याचे पाहून संशयितांनी कारची किल्‍ली घेतली व तेथून रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास पळ काढला. चालकाच्या ही बाब लक्षात आल्यानंतर त्याने कार मालकाला सांगून शाहूपुरी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज व कारच्या जीपीएस प्रणालीद्वारे तपासाला सुरुवात केली. त्यानुसार कार सोलापूर व पुढे कर्नाटक राज्यात असल्याची माहिती समोर आली. पोलिसांनी पथक करुन कारचा पाठलाग केला असता त्यावर सय्यद साजीद हा कार चालवत असल्याचे समोर आले. शाहूपुरी पोलिसांनी संशयिताला अटक केली असून त्याच्याकडे चौकशी सुरु आहे.

दरम्यान, इतर दोन्ही संशयितांची पोलिस माहिती घेत असून आंतरराज्य टोळी असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. पोलिस अधीक्षक संदीप पाटील, अप्पर पोलिस अधीक्षक विजय पवार, पोनि किशोर धुमाळ, पोनि चंद्रकांत बेदरे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि पी.पी.किर्दत, फौजदार कदम, फडतरे, चंद्रकांत कुंभार, प्रिती माने, गोरे यांनी कारवाईमध्ये सहभाग घेतला.