Thu, Apr 25, 2019 15:46होमपेज › Satara › खेळामध्ये सातार्‍याचा चेहरा मोहरा बदलला

खेळामध्ये सातार्‍याचा चेहरा मोहरा बदलला

Published On: Jan 06 2018 1:26AM | Last Updated: Jan 05 2018 11:15PM

बुकमार्क करा
सातारा : प्रतिनिधी

क्रिकेट, हॉकी आणि फुटबॉल हे खेळ वगळता सातार्‍यात आता कबड्डी, खो-खो, मॅरेथॉन, सायकलिंग आणि बॉक्सिंग सारख्या स्पर्धा मोठ्या प्रमाणात होऊ लागल्या आहेत. त्यामुळे खेळांमध्ये सातार्‍याचा चेहरा मोहरा बदलत आहे. बॉक्सिंगमध्ये यापूर्वी सातार्‍याचे युवक हे फक्‍त सहभाग नोंदवत होते. आता मात्र परिस्थिती बदलली असून योग्य मार्गदर्शन, मेहनत आणि कौशल्याच्या जोरावर सातार्‍याचे खेळाडू पुणे व मुंबईच्या स्पर्धकांना नमवून यश प्राप्‍त करत असल्याचे मत महाराष्ट्र राज्य ऑल्मपिक संघटनेचे अध्यक्ष आ. अजित पवार यांनी व्यक्‍त केले. 

तालीम संघ मैदानावर भरवण्यात आलेल्या राज्य बॉक्सिंग स्पर्धेच्या समारोप प्रसंगी आयोजित कार्यक्रमात बोलत होते. यावेळी आ. शिवेंद्रराजे भोसले, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, जिल्हा क्रीडाधिकारी सुहास पाटील, राज्य बॉक्सिंग संघटनेचे महासचिन भरतकुमार व्हावळ, जिल्हा अ‍ॅमॅच्युअर संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र चोरगे, कार्यवाह रवींद्र झुटींग, राजेेंद्र हेंद्रे, बी. जी. अगवणे व मान्यवर उपस्थित होते. 

आ. पवार म्हणाले, बॉक्सिंगला राष्ट्रीय व आतंरराष्ट्रीय स्तरावर लोकप्रियता आहे. मात्र, सातार्‍यात म्हणावी तशी लोकप्रियता मिळालेली नाही. राज्य बॉक्सिंग संघटनेकडून या खेळाला पोहचवण्यासाठी प्रयत्न होत आहेत. अनेक खेळाडूंनी या खेळात महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करत चेहरा दिला आहे. मात्र, मार्गदर्शन, कौशल्य आणि योग्य पध्दतीने मेहनत न घेतल्याने राज्यातील खेळाडू राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचत नाही. मंत्री असताना खेळाचा विकास व्हावा यासाठी निधी उपलब्ध केला होता. प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी एखादे क्रीडा संकुल व्हावे असा प्रयत्न केला होता. ऑल्मिपिकचे पदक मिळावे असे फक्‍त म्हटले जाते. मात्र, त्यासाठी इन्फ्रास्ट्रक्‍चर तयार करावे लागते. याकडे कोणी लक्ष देत नाही. याबाबत क्रिडा मंत्र्यांकडे गार्‍हाणे मांडले आहे. 

आ. शिवेंद्रराजे म्हणाले, बॉक्सिंगमध्ये सातार्‍याची आता ओळख होऊ लागली आहे. या खेळाचा प्रचार होऊ लागल्याने या खेळाकडे युवकांचा ओढा वाढला आहे. क्रिकेट, फुटबॉल व हॉकी हे खेळ वगळून इतर खेळांमध्ये सातार्‍यातील मुले यश मिळवू लागली आहे हे अभिमानास्पद आहे. या खेळाडूंना योग्य मार्गदर्शन मिळणे आवश्यक आहे. यासाठी आ. अजित पवार हे सहकार्य करतील, अशी खात्री आहे. राजेंद्र चोरगे यांनी प्रास्ताविक केले. 

आमची आधीच पंचिंग झाली आहे...

कार्यक्रमस्थळी आ. शिवेंद्रराजे भाषणाला निघाले असताना ‘बाबा, जरा पंच मारा,’ असा आवाज आला.  आपल्या भाषणात त्याचा संदर्भ देत आ. शिवेंद्रराजे म्हणाले, आमचे मित्र पंच मारा म्हणाले, पंच मारायला समोर कुठे कोण आहे? आमची आधीच पंचिंग झाली आहे.