होमपेज › Satara › डॉ. अतुल भोसले यांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा

डॉ. अतुल भोसले यांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा

Published On: May 30 2018 2:23AM | Last Updated: May 30 2018 12:00AMकराड  : प्रतिनिधी

पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला आहे. यासंदर्भातील नोटीफिकेशनवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी सायंकाळी सही केली असून, याबाबतचा शासन आदेशही नुकताच पारित झाला आहे. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या अध्यक्षांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा जाहीर होण्याची ही पहिलीच वेळ असून, डॉ. अतुल भोसले यांनी अल्पावधीतच श्री विठ्ठल देवस्थानचा कायापालट करण्यासाठी घेतलेल्या अथक परिश्रमांची दखल घेऊन, शासनाने त्यांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा बहाल केला आहे.

गेल्या वर्षी आषाढी यात्रेच्या वेळी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश चिटणीस डॉ. अतुल भोसले यांची राज्य शासनाने पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली. त्यानंतर डॉ. भोसले यांनी पंढरपूर हे देशातील पहिल्या क्रमांकाचे देवस्थान करण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचा निर्धार जाहीर करत, मंदिराच्या विकासासाठी सातत्याने विविध महत्त्वाचे निर्णय घेत आपल्या कार्याची छाप राज्यभरात उमटवली. महाराष्ट्रासह कर्नाटक व आंध्र प्रदेशातून विठ्ठल दर्शनासाठी येणार्‍या लाखो भाविकांना सुलभरित्या दर्शन मिळावे यासाठी डॉ. भोसले यांनी येत्या आषाढीपासून तिरूपती व शिर्डीप्रमाणे टोकन पद्धत सुरू करण्याचे नियोजन आखले आहे. संतसाहित्याचे संशोधन व्हावे आणि त्याचा प्रसार व्हावा, या उद्देशाने स्वतंत्र संत विद्यापीठ उभारण्यास डॉ. भोसले प्रयत्नशील असून, त्यांच्या पाठपुराव्यामुळे शासनाने ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर यांच्या अध्यक्षतेखाली संत तुकाराम महाराज संतपीठ नावाची संस्था स्थापन करण्यासाठी 15 नामवंत तज्ज्ञांची समिती नुकतीच गठीत केली आहे.  

डॉ. अतुल भोसले यांच्या प्रयत्नामुळे मंदिर परिसराच्या विकासासाठी कॅनडा सरकारने सहकार्य करण्यास मान्यता दिली असून, याबाबत दोन्ही देशांच्या स्तरावर चर्चा सुरू आहे. डॉ. भोसले यांनी मंदिर परिसरासह प्रदक्षिणा मार्ग व चंद्रभागेचे वाळवंट स्वच्छ करण्यासाठी पुढाकार घेऊन, या कामासाठी स्वतंत्र ठेकेदार नेमला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे पंढरपूर आता चकाचक दिसू लागले आहे. तब्बल 350 खोल्यांची क्षमता असणार्‍या सुसज्ज व देखण्या भक्तनिवास वास्तूचे काम डॉ. भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, लवकरच ते भाविकांसाठी खुले केले जाणार आहे. भाविकांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे यासाठी पंढरपूर शहरात 5 ठिकाणी वॉटर एटीएम बसविण्याचेही नियोजन सुरू आहे. श्री क्षेत्र पंढरपूरचे पर्यटनदृष्ट्या महत्व वाढविण्याच्या दृष्टीने ‘श्री विठ्ठल रूक्मिणी देवस्थान’ या नावाचे मोबाईल अ‍ॅप सुरू करण्यात आले आहे. महिला भाविकांसाठी चंद्रभागा वाळवंटात चेंजिंग रूम उभारण्याचा महत्वपूर्ण निर्णयही डॉ. अतुल भोसले यांनी घेतला. तसेच श्रींच्या चरणी अर्पण झालेले वेगवेगळ्या स्वरूपातील 24 किलो सोने आणि 800 किलो चांदी वितळवून त्यांच्या विठ्ठल चरणातील विटांच्या स्वरूपात वस्तू तयार करण्याचा महत्वाचा निर्णय डॉ. भोसले यांनी घेतला. याशिवाय भाविकांना लाडू प्रसाद, मंदिर समितीच्या कर्मचार्‍यांना गणवेश असे अनेक महत्वाचे निर्णय घेऊन डॉ. अतुल भोसले यांनी अवघ्या 10 महिन्यांच्या कालावधीत श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर व परिसराचा कायापालट केला आहे. 

डॉ. अतुल भोसले यांच्या या कार्याची दखल घेत आणि त्यांना मंदिराचा अधिकाधिक विकास करता यावा या उद्देशाने मुख्यमंत्र्यांनी त्यांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा बहाल केला आहे. या पदामुळे डॉ. भोसले यांना शासकीय व राजकीय बळ प्राप्त झाले असून, त्याचा फायदा पंढरपूर देवस्थानसह कराड दक्षिण मतदारसंघातील गावांनाही होणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माझ्यावर दाखविलेल्या विश्‍वासाबद्दल मी त्यांचा आभारी असून, या पदाला राज्यमंत्रिपदाचा दर्जा देऊन त्यांनी समस्त वारकरी संप्रदायाचा सन्मान केला आहे. पंढरपूरला श्री विठ्ठलाच्या भेटीसाठी येणार्‍या लाखो भाविकांना अधिकाधिक सोयी-सुविधा देण्याचा माझा प्रयत्न असून, वारकरी केंद्रबिंदू मानूनच मी यापुढेही कार्यरत राहणार आहे.
ना. डॉ. अतुल भोसले