Wed, Nov 14, 2018 18:41



होमपेज › Satara › मागच्या दाराने आणीबाणी 

मागच्या दाराने आणीबाणी 

Published On: Jan 06 2018 1:26AM | Last Updated: Jan 05 2018 11:27PM

बुकमार्क करा




सातारा : प्रतिनिधी

राज्य  होरपळून निघत आहे. गेली तीन वर्षे जनता अस्वस्थ आहे. मत व्यक्‍त करण्यालाही बंधने घातली जात आहेत. ही एक प्रकारची मागच्या दाराने लादलेली आणीबाणी आहे. हे सरकार अपयशी ठरले असल्याने ही आणीबाणी झुगारून उलथवून टाकली पाहिजे, अशी स्पष्ट भूमिका राष्ट्रवादीचे नेते व माजी उपमुख्यमंत्री आ. अजित पवार यांनी सातार्‍यात पत्रकार परिषदेत मांडली. दरम्यान, भीमा कोरेगाव प्रकरणात सरकारने जे करायला हवे होते ते काहीही केले नाही. परिस्थिती आटोक्यात आणण्यात सरकार अपयशी ठरले आहे. हे सर्व प्रकरण घडवणार्‍या प्रवृत्तींचा शोध घेऊन त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी आपली मागणी आहे, असेही आ. अजित पवार म्हणाले.

आ. अजित पवार म्हणाले, भीमा कोरेगाव प्रकरण आत्ताच कसे घडले? हा पूर्व नियोजित कट आहे. सरकारला पोलिस यंत्रणेला याची माहिती असायला हवी होती. गृह मंत्रालयाचे व सरकारचे हे मोठे अपयश आहे. भीमा कोरेगाव घडवण्यामध्ये ज्या ज्या प्रवृत्ती आहेत त्यांचा शोध घ्या, त्यांना कडक शासन झाले पाहिजे. जनतेनेही शांतता व सलोखा ठेवावा. माथी भडकवणारे अनेकजण असतात. आपण सगळे भारतीय आहोत. माणुसकी हीच आपली जात आहे आणि तोच आपला धर्म आहे. हे महाराष्ट्रातील तमाम जनतेने लक्षात ठेवावे. 

आ. अजित पवार म्हणाले, वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांनी असहिष्णुतेच्या विरोधात विडा उचलला आहे. साहित्यिकांचा राजकारणाशी काहीही संबध नसतो. मात्र, एक नागरिक म्हणून देशाचा चांगला विचार त्यांच्या मनामध्ये असतो. देशात असहिष्णुता असल्यानेच या लोकांनी पुरस्कार परत केले. डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे, डॉ. कलबुर्गी यांच्या हत्या झाल्या. हे खुन झाल्यानंतर इतके महिने झाल्यानंतरही यामागील मास्टर माईंड पकडला गेला नाही. ज्या व्यक्‍तिंनी जे कार्य केले त्यांच्या विरोधातील लोक या घटनांमागे आहेत का? हे सरकारने पहायला पाहिजे. असेही आ. अजित पवार म्हणाले. 

आ. अजित पवार पुढे म्हणाले, नवीन सरकारला संधी दिली पाहिजे, अशी जनतेची भावना होती. त्यामुळेच सरकारला निवडून दिले. पहिल्यांदा जनता शांत होती. मात्र, तीन वर्ष झाल्यांनतर सरकारने आश्‍वासनांची पूर्तता केली नाही. वर्ष पालटेल तसा सरकारवरील रोष वाढत गेला. त्यामुळेच मोठ मोठे मोर्चे निघाले. मोर्चांना प्रतिमोर्चे प्रत्येक समाजाचे वेगळे मोर्चे निघाले. कोपर्डी प्रकरणातही सरकार भाषणाच्या पुढे काहीही करत नाही. भिमा कोरेगाव प्रकरणी न्यायालयीन चौकशी लावली ही चांगली गोष्ट आहे. मात्र, चौकशी लावून प्रश्‍न सुटणार नाही. माथी भडकावण्याचे काम जे करत आहेत त्यांचा शोध घ्यावा, अशी मागणीही त्यांनी केली. 

सगळ्या जाती धर्माच्या लोकांना एकत्र येऊन सातार्‍यात जी जातीय सलोख्याची फेरी काढली याचे स्वागत आहे. भिमा कोरेगाव घटनेत अजूनही धुसफूस पहायला मिळते. हे प्रकरण संपूर्ण शांत झालेेले नाही. मुंबईत दंगली उसळल्या त्यावेळी सरकारने पुढाकार घेऊन शांत केले. मात्र, या प्रकरणात सरकारने काहीच केल्याचे दिसून येत नाही. भिमा कोरेगावमध्ये कोणीही राजकीय पोळी भाजू नये, असा सल्‍लाही आ. अजित पवार यांनी दिला. 

सत्तेवर येण्यासाठी राजू शेट्टी, महादेव जानकर, विनायक मेटे, यांना सोबत घेतले. मात्र, आता परिस्थिती वेगळी आहे. रामदास आठवलेंचे समर्थक रस्त्यावर उतरले त्यानंतर रामदास आठवलेंनाही आता विचार करण्याची बाब ठरली आहे, असेही ते म्हणाले. जे सत्तेत सामील आहेत तेच सरकारवर नाराज आहेत, असे सांगून अजित पवार म्हणाले, राज्यात बर्‍यापैकी पाऊस झाला. कर्जमाफीत चुका झाल्या हे सभागृहात सिध्द झाले. डीपीसीला कट लागला आहे. विकास निधी मिळत नाही. प्रशासन हतबल, कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा पोलिस खात्याचे अपयश आहे, अशा अपयशी सरकारला आता जनताच झुगारेल, असेही अजित पवार म्हणाले.

आ. शिवेंद्रराजे - चोरगे एकत्र, त्याचे स्वागतच

सातार्‍यात एकमेकांचे विरोधक असलेले आ. शिवेंद्रराजे भोसले व राजेंद्र चोरगे आता एकत्र येत आहेत. याकडे लक्ष वेधले असता आ. अजित पवार म्हणाले, या घटनेकडे राजकारण म्हणून पाहू नका. हा खेळ आहे. राजेंद्रने चांगली कामे केली आहेत. शिवेंद्रराजे सकारात्मक आहेत. दोघे एकत्र येत असतील तर भविष्यासाठी त्याचे स्वागतच आहे.