Sun, Jul 21, 2019 16:14
    ब्रेकिंग    होमपेज › Satara › पगारावर कोट्यवधी खर्च, तरीही शिक्षण गचाळ

पगारावर कोट्यवधी खर्च, तरीही शिक्षण गचाळ

Published On: Apr 24 2018 1:07AM | Last Updated: Apr 23 2018 10:38PMसातारा : प्रतिनिधी

राज्यात शिक्षकांच्या पगारावर कोट्यवधी रुपयांचा खर्च होतो. मात्र, तरीही  आपल्याच राज्याची शिक्षण व्यवस्था गचाळ आहे. विद्यार्थ्यांना गुणाकार व भागाकार करता येत नाही, मग तुम्ही काय करता? ‘खोटं बोल अन् रेटून बोल’ अशी अवस्था अनेक भागांत आहे. विद्यार्थ्यांच्या बाबतीत खोटी आकडेवारी सरकारला सादर केली जात असल्याचा गंभीर आरोप करत शिक्षण विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार यांनी राज्यातील शिक्षण विस्तार अधिकार्‍यांची चांगलीच खरडपट्टी काढली. 

सातारा जिल्हा परिषदेच्या स्व. यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृहात महाराष्ट्र विद्या प्राधिकरण व शिक्षण विभागाच्या वतीने आयोजित केलेल्या शिक्षण विस्तार अधिकार्‍यांच्या राज्यस्तरीय शिक्षण परिषदेमध्ये ते बोलत होते. यावेळी  मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे, बालभारतीचे संचालक मगर, उपसंचालक मकरंद गोंधळी, माध्यमिक शिक्षणाधिकारी देविदास कुलाळ, प्राथमिक शिक्षणाधिकारी पुनिता गुरव, डायटचे प्राचार्य रामचंद्र कोरडे उपस्थित होते.

नंदकुमार म्हणाले, प्रधान सचिव या नात्याने मी राज्यभर विविध शाळांचे दौरे केले. यामध्ये अनेक वाईट अनुभव आले. बहुतांश मुलांना भागाकार येत नसल्याची परिस्थिती सर्वत्र आहे. ज्ञानरचनावादानुसार सुरुवातीच्या वर्गातील मुलांना शिक्षण चांगले येते. मात्र, आठवीपर्यंतच्या मुलांना येत नाही. आज राज्यात सर्वांत जास्त गणिताची भीती वाटत आहे. मुलांना भाषांशिवाय काही येत नाही. त्यासाठी पहिली ते पाचवीपर्यंत अध्ययनस्तर निश्‍चित केला तरच विद्यार्थ्यांना चांगले ज्ञान मिळणार आहे. 

शिक्षण विस्तार अधिकार्‍यांनी ठरवलं तर काहीही होवू शकते. 100 टक्के मुलांना भागाकार का येत नाही? मुलांच्या समस्या सोडवण्यासाठी संशोधन करा. प्रत्येकाला गणित, विज्ञान कळले पाहिजे. प्रत्येक मुल 100 टक्के शिकले पाहिजे. 100 टक्के मुलांना 75 टक्क्यापेक्षा जास्त गुण मिळाले पाहिजेत, या पध्दतीने प्रत्येकाने विचार केल्यास आणखी महाराष्ट्र पुढे जाणार आहे. काही शिक्षक हे अध्यापन करत असताना त्यांच्या डोक्यात वेगळेच विचार असतात. हे विचार जोपर्यंत संबंधित शिक्षक डोक्यातून काढत नाही तोपर्यंत विद्यार्थ्यांची प्रगती होणार नाही.  

डॉ. कैलास शिंदे म्हणाले, राज्याच्या शिक्षण क्षेत्रात सातारा जिल्ह्याचे भरीव काम झाले आहे. प्रथम कुमठे बीटात ज्ञानरचनावादावर आधारित शिक्षण सुरू झाले. त्याचेच अनुकरण सध्या राज्यात सुरू आहे. तरीही ‘असर’च्या अहवालावर शिक्षण विस्तार अधिकार्‍यांनी आत्मपरिक्षण केले पाहिजे. 

दरम्यान, सकाळी जिल्हा परिषद अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर यांच्यासह अन्य पदाधिकार्‍यांच्या उपस्थितीत परिषदेचे उद्घाटन करण्यात आले. अधिव्याख्याते नामदेव माळी यांनी मनोगत व्यक्‍त केले. तर शिक्षण विस्तार अधिकारी प्रतिभा भराडे यांनी शैक्षणिक साहित्याचे सादरीकरण केले. 

उन्हाळी सुट्टी मुलांना आहे, शिक्षकांना नाही..

नंदकुमार यांनी आपल्या भाषणात खासगी शाळांमधील शिक्षकांना सरकारी शिक्षकांच्या तुलनेत कमी पगार मिळत असला, तरी ते भरपूर शिकवतात. मात्र, जिल्हा परिषद व सरकारी शाळांमध्ये हे चित्र विदारक असल्याची उपस्थितांना जाणीव करून दिली. उन्हाळी सुट्टी मुलांना आहे, शिक्षकांना नाही. सुट्टीच्या दीड महिन्याच्या कालावधीत पुढील शैक्षणिक वर्षाची तयारी व नियोजन करा. ज्या ठिकाणी तुम्ही काम करणार आहात, त्या ठिकाणी मुलांना शिकवलं पाहिजे, असेही नंदकुमार म्हणाले.