होमपेज › Satara › राजधानी महोत्सव मंडप उभारणीचा प्रारंभ 

राजधानी महोत्सव मंडप उभारणीचा प्रारंभ 

Published On: May 24 2018 1:33AM | Last Updated: May 23 2018 11:06PMसातारा : प्रतिनिधी

‘राजधानी महोत्सव’ हा जनतेचा महोत्सव आहे, या महोत्सवास अनेकांचे सहकार्य लाभत आहे, राजधानी महोत्सवाच्या माध्यमातून, मराठा साम्राज्याची राजधानी असलेल्या सातार्‍याची सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात एक वेगळी ओळख निर्माण होईल, या महोत्सवात सर्व सातारकर जिल्हावासियांनी सहभागी व्हावे, असे आवाहन सातारा लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्री छ. उदयनराजे भोसले यांनी केले.

खा. उदयनराजे, माजी जि.प.  सदस्य बाळासाहेब गोसावी यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते राजधानी महोत्सवाच्या मंडप व मंचक उभारणीचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सभापती सुनील काटकर, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रवि साळुंखे, पंकज चव्हाण, संदीप शिंदे, अ‍ॅड. अंकुश जाधव, डॉ.शेखर घोरपडे, अ‍ॅड.विकास पवार उपस्थित होते.

तीन दिवसीय महोत्सवाची सुरुवात शुक्रवार दिनांक 25  मे  रोजी सकाळी 9.00 वाजता इतिहासकालीन शस्त्रकलेचे प्रदर्शन शिवकालीन खेळांचे प्रदर्शन किल्‍ले अजिंक्यतारा येथे होणार असून यावेळी राजमाता श्री छ. कल्पनाराजे भोसले,  शिवप्रतिष्ठान हिंदूस्थानचे संभाजी भिंडे गुरुजी, जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल उपस्थित राहणार आहेत.

शनिवार दिनांक  26 मे  रेाजी शाहू क्रीडा संकुलामध्ये युवागिरी रॉक बॅन्ड शो सायंकाळी 6.00 वाजता आयोजित करण्यात आला आहे. रविवार दि. 27 मे रोजी सायंकाळी 6.00 वाजता  क्रीडा संकुल येथेच राजघराण्याच्या वतीने प्रदान करण्यात येणार्‍या  सातारा गौरव पुरस्कारांचे विविध क्षेत्रातील मान्यवरांना वितरण केले जाणार आहे.