Fri, Apr 26, 2019 00:10होमपेज › Satara › ‘स्थायी’त साविआ-नविआत हमरीतुमरी

‘स्थायी’त साविआ-नविआत हमरीतुमरी

Published On: Apr 13 2018 1:19AM | Last Updated: Apr 12 2018 10:58PMसातारा : प्रतिनिधी

सातारा नगरपालिकेच्या स्थायी सभेत विषयपत्रिकेवरील सुमारे 167 विषय तहकूब ठेवण्यात आले आहेत. त्यामध्ये नगर विकास आघाडी तसेच भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांच्या बहुतांश विषयांचा समावेश असल्याचे बोलले जाते. तब्बल चार महिन्यांनी बोलावलेल्या सभेत सुमारे 65 दरमंजुरीचे विषय मंजूर करण्यात आले. बजेट तरतुदीचे कारण सांगत विषय तहकूब केल्याने नविआ तसेच साविआ नगरसेवकांमध्ये जोरदार हमरीतुमरी झाली.

सातारा नगरपालिकेच्या स्थायी सभेला तब्बल चार महिन्यांतर मुहूर्त सापडला. नगरसेवकांमध्ये सुरू असलेल्या धुसफुशीमुळे तसेच मागील बजेट उशिरा मंजूर झाल्याने बरेच विषय मंजुरीच्या प्रतीक्षेत होते. मात्र, स्थायी सभा काढण्यास विलंब होत असल्याने शेकडो विषय अक्षरश: मंजुरीच्या प्रतीक्षेत तुंबले होते.  सर्वसाधारण सभा झाल्यानंतर सातारा नगरपालिकेच्या कमिटी हॉलमध्ये गुरुवारी सकाळी 11 वाजता स्थायी समितीची सभा नगराध्यक्षा सौ. माधवी कदम यांच्या अध्यक्षतेखाली तसेच उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के, सभापती मनोज शेंडे, यशोधन नारकर, श्रीकांत आंबेकर, अनिता घोरपडे व नगरसेविका स्मिता घोडके, नगरसेवक अ‍ॅड. डी. जी. बनकर, शेखर मोरे-पाटील या सदस्यांच्या उपस्थितीत पार पडली.

सभेच्या सुरुवातीलाच सभा सचिवांच्या अनुपस्थितीचा मुद्दा उपस्थित झाला. सभा सचिव गैरहजर असल्याने विषयपत्रिका व त्याच्याशी संबंधित सूचना कोण वाचणार? सभेचे मिनिट्स कोण लिहिणार? असा प्रश्‍न अ‍ॅड. डी. जी. बनकर यांनी केला. सभागृहाचे कामकाज पाहणारे तुकाराम गायकवाड तसेच शिंपुगडे यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली. सभेसमोर चर्चेसाठी घेतलेल्या सर्व विषयपत्रिकेवरील कामांवर मागील बजेटमधून की चालू बजेटमधून खर्च करणार? अशी विचारणा अ‍ॅड. बनकर यांनी केली. चालू बजेट अजून मंजूर नसल्याने दर मंजुरीचेच विषय मंजूर करुन उर्वरित विषयांसाठी पुन्हा  सभा बोलवावी, असे सुचवण्यात आले. त्यावेळी शेखर मोरे-पाटील म्हणाले, सभेसमोर सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याचे विषय मंजुरीसाठी घेतले आहेत. या कामांना आता मंजुरी मिळाल्यावर चालू बजेटमधून त्याला खर्च करता येईल. हे विषय यावेळी मंजूर करावेत व दरमंजुरीचे विषय वाचावेत, अशी मागणी मोरे यांनी केली.

विषयपत्रिकेवर चर्चा काय करायची? दरमंजुरीचे सर्व विषय मंजूर असे म्हणून साविआचे नगरसेवक  हॉलमधून बाहेर पडू लागले. बजेटमध्ये तरतूदच नव्हती तर सभा का बोलावली? असा सवाल मोरे यांनी केला. त्यावेळी दोन्ही आघाडीच्या नगरसेवकांमध्ये तडातडी झाली. पंधरा-वीस मिनिटांत 73 विषय मंजूर करण्यात आले तर तहकूब सुमारे 167  विषयांसाठी आठ दिवसांत पुन्हा सभा बोलावण्याचे आश्‍वासन मोरेंना देण्यात आले.