Thu, Jun 27, 2019 01:33होमपेज › Satara › तमाशात कलगी-तुरा होतोय कालबाह्य 

तमाशात कलगी-तुरा होतोय कालबाह्य 

Published On: Dec 15 2017 2:47AM | Last Updated: Dec 14 2017 8:58PM

बुकमार्क करा
कलगी -तुरा म्हणजे काय?

कलगी-तुरा हा शब्द कलगी आणि तुरा हे दोन शब्द मिळून तयार झाला आहेत. याचा अर्थ एकच पागोटे किंवा टोपी यांना लावण्यासाठी मोती,फुले यांचे एक भूषण. यालाच कलगी -तुरा म्हणतात. महाराष्ट्रातील तमाशावाल्यांत कलगीवाले व तुरेवाले असे दोन संप्रदाय आहेत.कलगी याचा अर्थ पागोट्यात लावायचा अलंकार. तुर्‍याचाही तोच अर्थ आहे.कलगी शद्ब मूळ तुर्की भाषेतला आणि तुरा अरबी भाषेतला.

हे दोन्ही शब्द पारशी भाषेत जसेच्या तसे आढळतात.तिथूनच ते मराठी भाषेत आले.कलगी म्हणजे माया किंवा प्रकृती.तुरा म्हणजे ब्रम्ह किंवा पुरुष असा त्याचा अध्यात्मपर अर्थ करतात.कलगीवाल्यांना नागेश तर,तुरेवाल्यांना हरदास म्हणतात. कलगीवाले शक्तीचे उपासक तर तुरेवाले शिवाचे उपासक,कलगीवाल्यांचे निशाण भगवे तर तुरेवाल्यांचे हिरवे किंवा पांढरे निशाण असते.


पुसेसावळी : वार्ताहर 

लोक वाड:मयातील कलगी-तुरा हा लोककला प्रकार ग्रामीण भागात जतन करण्यासाठी शाहिरांची धडपड सुरु असून या कलेचे जतन करण्यासाठी शासनाने प्रयत्न करण्याची मागणी होत आहे.

मराठी वाड्:मयाच्या इतिहासात मराठी शाहीरी वाड्:मयाला महत्त्वाचे स्थान असून प्राचीन काळापासून भारतीय समाजमनावर वेद-पुराण वाड:मयाचा प्रभाव दिसतो. याच कारणामुळे माणसांना नेहमी अध्यात्माची ओढ राहिलेली आहे. अध्यात्म हा विषय शाहिरीचा पाया आहे. मात्र, कलगी-तुरा म्हणजे काय? याबाबत शहरी लोक अद्यापही अनभिज्ञ आहेत.

भिंगार(जि. अहमदनगर)हे गाव कलगीतुर्‍याचे माहेरघर आहे. महाराष्ट्रातील सर्व प्रमुख फड भिंगारला हजेरी लावतात.शाहिरांनी शृंगाररसपूर्ण वाड्:मयाची निर्मिती केली. माणसांवर त्याची भूरळ पडली. गूढ अशा ओढीने शाहिरांनी शाहिरी रचायला सुरुवात केली. भेदीक हे तळागाळातील लोकजीवनाशी समरस झालेले आहे. यामधून अद्वैत जिवननिष्ठा, अभेद भक्तीचा प्रसार व प्रचार झाला.

अध्यात्म महाराष्ट्रीय संस्कृतीशी एकरुप झाले. सर्वसामान्य लोकांच्या आत्मोन्नतीचे साधन म्हणून लोकजीवनात याला महत्त्व प्राप्त झाले.  संत ज्ञानेश्‍वरांपासून, समर्थ रामदास तसेच अलमखानबाबा यांच्या काळापर्यंत महाराष्ट्रात आध्यात्मिक रचना करण्याची परंपरा शाहिरांनी टिकवून ठेवली आहे. तमाशाच्या फडावर दोन्ही पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकतात.रात्रभर त्यांचे सवाल-जवाब होतात.कलगीवाल्यांनी लावणी म्हणायची व तुरेवाल्यांनी जवाबाची लावणी म्हणून कलगीवाल्यांना प्रतिसवाल करायचा. या स्पर्धेत जो हरेल त्याचे निशान व डफ दुसर्‍या पक्षाने काढून घ्यायचे, असा प्रकार व्हायचा. शाहिरी प्रकाराच्या अभ्यासात कलगी-तुरा परंपरेला वैशिष्ठपूर्ण व महत्त्वाचे स्थान आहे. लोककलांच्या माध्यमातून हे वाड्:मय लोकाभिमुख झाले असून तमाशातील हा दुर्मीळ लोककला प्रकार जतन करण्याची गरज आज निर्माण झाली आहे.

कलगी तुरा परंपरा

अध्यात्मिक मराठी शाहिरी कविता,भेदिक कविता,कलगी-तुरा,डफगाणे अशा नावांनी हा प्रकार ओळखला जातो.अध्यात्मातील अनेक गूढ कुटांची उकल करुन त्यातील भेद उलगडून दाखविणारी कविता. डफगाणे हे बाह्यरुप स्पष्ट करणारे आहे.यादवपूर्व काळापासूनची याला परंपरा आहे. महानुभाव साहित्यातील लीळेत याचा उल्लेख सापडतो.