Sat, Jun 06, 2020 01:08होमपेज › Satara › उदयनराजे यांच्याविरोधात लढायला श्रीनिवास पाटील तयार

उदयनराजे यांच्याविरोधात लढायला श्रीनिवास पाटील तयार

Published On: Oct 01 2019 2:03AM | Last Updated: Oct 01 2019 12:43AM
सातारा : प्रतिनिधी
सातारा लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्याविरोधात लढायला कोणच तयार होत नाही, असे दिसल्यानंतर माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांना राष्ट्रवादीने उदयनराजेंविरोधात लढण्याची तयारी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे कार्यकर्ते कराड दक्षिण विधानसभा मतदार संघासाठी आग्रही असल्याने राष्ट्रवादी दि. 2 ऑक्टोबर रोजी उमेदवारीबाबतचा अंतिम निर्णय घेणार आहे. त्यामुळे उदयनराजेंविरोधात श्रीनिवास पाटील अशीच लढत होण्याची दाट शक्यता आहे. 

उदयनराजे भोसले यांनी खासदारकीचा राजीनामा देऊन भाजप प्रवेश केल्यामुळे राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला होता. या पोटनिवडणुकीसाठी उदयनराजेंच्या विरोधात कुणाला उतरवायचे? यावरच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद  पवार यांनी सर्व चाचपण्या केल्या आहेत. मात्र, श्रीनिवास पाटील प्रारंभी निवडणूक लढवण्यास इच्छुक नव्हते. त्यामुळे अन्य पर्यांयाचाही विचार झाला. ही जागा काँग्रेसला सोडून पृथ्वीराज चव्हाण यांना उमेदवारी देण्यावरही आघाडीत बराच खल झाला. पृथ्वीराज चव्हाण यांनी रविवारी झालेल्या कराडच्या मेळाव्यात दोन दिवसात निर्णय जाहीर करणार असल्याचे सांगितले होते तर त्याचवेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील या जागेवर राष्ट्रवादीच लढणार असल्याचे स्पष्ट केले होते. पृथ्वीराज चव्हाण यांच्या लोकसभा उमेदवारीचे संकेत मिळाले असतानाच सोमवारी कराड दक्षिण विधानसभा मतदार संघातून पृथ्वीराज चव्हाण निवडणूक लढवणार असल्याचे वृत्त प्रसारित झाले.  

पृथ्वीराज चव्हाण यांना हायकमांडने लोकसभा लढवण्याचे आदेश दिले असल्याचे बोलले जात आहे. मात्र, तरीही उदयनराजेंविरोधात लढण्याचे धाडस ते दाखवत नाहीत.  कार्यकर्त्यांचाही तसाच मूड आहे. त्याचवेळी मात्र कराड दक्षिण विधानसभेसाठी कार्यकर्ते आग्रही आहेत. पृथ्वीराजांच्या हो-ना मुळे राष्ट्रवादी चिंतीत असून त्यांनी श्रीनिवास पाटील यांना तयारी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे श्रीनिवास पाटील यांचे कार्यकर्ते सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह झाल्याचे दिसत आहे.  
उदयनराजे विरोधात श्रीनिवास पाटील अशी लढत झाली तर ती अटीतटीची होणार आहे.