Mon, Apr 22, 2019 04:29होमपेज › Satara › ‘रंग भरे बादल से, तेरे नयनो के काजल से’

‘रंग भरे बादल से, तेरे नयनो के काजल से’

Published On: Feb 26 2018 1:18AM | Last Updated: Feb 25 2018 10:35PMसातारा : प्रतिनिधी

सुप्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवी यांच्या रूरपाने बॉलीवूडची ‘चांदनी’ निखळल्याने सातारकर चाहतेही हेलावून गेले. सातार्‍यात श्रीदेवीचा चाहता वर्ग मोठा असून सुमारे दहा वर्षांपूर्वी सातार्‍यात येऊन गेलेल्या या अभिनेत्रीच्या अनेक आठवणींना उजाळा देताना रविवारी मात्र  सातारकर चाहत्यांना हुंदका आवरता आला नाही. ‘रंग भरे बादल से तेरे नयनो के काजल से’ या चांदनी चित्रपटातील गीताची आठवण करून देणार्‍या या चाहत्यांचे अपोआपच डोळे पाणावले. 

बॉलीवूडची हवाहवाई गर्ल म्हणून ओळखल्या जाणार्‍या श्रीदेवीचे दुबई येथे हृदयविकाराने निधन झाल्याचे वृत्त सकाळी सकाळीच कानावर पडल्यानंतर सातार्‍यातील चाहत्यांना आपल्या लाडक्या अभिनेत्रीची अकाली झालेली एक्झिट मनाला चटका लावून गेली. सुमारे दहा वर्षांपूर्वी ही अभिनेत्री एका कार्यक्रमाच्या निमित्ताने पती बोनी कपूरसह सातार्‍यात आली होती. त्यावेळी चाहत्यांनी तिच्या कार्यक्रमास     तोबा गर्दी केली होती. यावेळी सातारकरांशी संवाद साधताना तिने सातारकरांची मने जिंकली. ‘ती आली, तिने पाहिले आणि ती जिंकली’ अशीच भावना त्यावेळी सातारकरांनी व्यक्‍त केली होती. 

सातार्‍यातील एका चित्रपट गृहात तिचा चाँदणी हा चित्रपट त्यावेळी प्रदर्शित झाल्यानंतर शहरासह जिल्ह्यातील चाहत्यांनी हा चित्रपट अक्षरश: डोक्यावर घेतला होता. अनेक कालावधी एकाच चित्रपट गृहात खिळून राहिलेल्या या चित्रपटाने सातारकर रसिकांना चाँदणीच्या आणखी प्रेमात पाडले. या चित्रपटातील ‘रंग भरे बादलसे तेरे नयनोके काजलसे,  चाँदणी तू मेरी चाँदणी’ या गीताने चाहत्यांना वेड लावले. त्या आठवणींना अन् त्या गीताला उजाळा देताना या चाहत्यांच्या डोळ्यातून मात्र आपोआपच पाणी ओघळले. 

सोशल मीडियावरही श्रीदेवीला श्रद्धांजली
सातारकर चाहत्यांनी सोशल मीडियावरही श्रीदेवीचेे सुपरहिट ठरलेले चित्रपट सदमा, हिंमतवाला, मवाली, कलाकार, तोहफा, नगीना, मि. इंडिया, चांदणी, चालबाज, लम्हे, गुमराह, लाडला, जुदाई अशा  विविध चित्रपटांतील तिचे संवाद श्रद्धांजली संदेशातून व्यक्‍त केले. चित्रपटसृष्टीशी संबंधित असलेल्या अनेक मान्यवरांनीही श्रीदेवीच्या अकाली जाण्याने शोक व्यक्‍त केला.