Thu, Apr 18, 2019 16:09होमपेज › Satara › उंडाळे भागातील दिंडीला अध्यात्म, साहित्याची परंपरा

उंडाळे भागातील दिंडीला अध्यात्म, साहित्याची परंपरा

Published On: Jul 16 2018 1:21AM | Last Updated: Jul 15 2018 9:04PMउंडाळे : वैभव पाटील

कराड दक्षिणच्या डोंगरी विभागाला अध्यात्माची  जुनी परंपरा असुन अध्यात्म आणि साहित्य याची  जोड उंडाळेच्या मातीत माजी  मंत्री विलासराव पाटील उंडाळकर यांनी  रूजवली. गेली   25 ते 30 वर्षांपासून येथे समाज प्रबोधनाचे व्यासपीठावरून त्यांनी  ग्रामीण भागात समाज प्रबोधन  सुरू ठेवले आहे. याच प्रबोधनाबरोबर अध्यात्म आणि विठ्ठल माऊलींची  ओढ असणार्‍या कराड दक्षिण विभागात अध्यात्माचा मोठा जागर आहे. या अध्यात्माच्या ओढीने पंढरपुरच्या आषाढी एकादशी दिवशी या विभागातून  विठ्ठलनामाचा गजर करत तीन दिंड्या पंढरपूरकडे प्रस्थान करतात. 

या विभागात सर्वात प्रथम कृष्णत बुवांची  दिंडी प्रसिध्द होती. यानंतर या विभागात नव्या पिढीतील भक्‍तजनांनी अध्यात्माच्या ओढीने नव्याने पंढरपुरला दिंडी  सोहळा सुरू केला. यामध्ये उंडाळे येथून एक दिंडी निघते. ही  दिंडी उंडाळे येथुन सुरू होत नाही पण येथील भक्‍तगण ज्ञानेश्‍वर व तुकाराम महाराजाची  पालखी  जेथून निघते त्या देहु व आळंदी  येथून निघणारी दिंडी आता देहु येथून प्रस्थान करते. या दिंडीत ह.भ.प. तानाजी  लोहार महाराज, ह.भ.प. भानुदास महाराज, शंकर बुवा ह.भ.प. नाना सुतार महाराज यासह 40 ते 50 वारकर्‍यांचा जथ्थ्या असतो. उंडाळे येथे एकत्र येऊन माऊलींच्या पालखी बरोबर ही  दिंडी  पंढरपुरला पोहोचते.     

दुसरी दिंडी तुळस व म्हासोली येथुन प्रस्थान करते. त्यांच्या गुरूकुल वारकरी संस्थेचे अध्यात्म शिक्षण घेणारी मुले या दिंडीच्या प्रारंभी आपले अध्यात्म कौशल्य साजरे करून अध्यात्माकडे तरूणांनी  वळावे हा उपदेश देतात. ही दिंडी तुळसण म्हासोली  येथुन सुरू होत असली तरी कराड, शिराळा, वाळवा यासह तालुक्यातुन भक्‍तगण या दिंडीत सहभागी होतात. ही दिंडी राधेशाम आश्रम दिंडी म्हणून ओळखली जाते. या दिंडीचे हे 17 वे वर्ष आहे. तिसरी दिंडी शेवाळेवाडी येवती येथुन प्रस्थान करते. अगदी  अलीकडच्या 4 ते5 वर्षांत ही दिंडी ह.भ.प. पेंटर महिदकर यांच्या नेतृत्वाखाली निघते. हिचा प्रवास येवती, म्हासोली, सवादे, ओंड नांदगाव, काले, मलकापुर, रायगाव, मायणी  दिघंची  असा असून ज्येष्ठ भक्‍तजणांबरोबर नव्या पिढीलाही पांडुरंगाची आस आहे, हे दिंडीने दाखवून दिले आहे.      

दक्षिणेत तीन दिंड्यांबरोबर जाणारे भक्‍तजण तब्बल 15 दिवस हरिनामाचा गजर करत तल्लीन होऊन 300 ते 350 किमी अंतर आनंदनाने पार करतात. विठुरायाच्या पायावर डोक टेकून धन्य होतात. आणि सांगतात. ‘जातो माघारी  पंढरीराया तुझे दर्शन झाले आता’.