होमपेज › Satara › नगरसेवकांकडूनच खासदार-आमदारांच्या उखाळ्यापाखाळ्या

नगरसेवकांकडूनच खासदार-आमदारांच्या उखाळ्यापाखाळ्या

Published On: Jun 21 2018 10:56PM | Last Updated: Jun 21 2018 10:36PMसातारा : प्रतिनिधी

सातारा नगरपालिकेच्या विशेष सभेत प्रबळ विरोधक असलेली नगर विकास आघाडी, तसेच सत्ताधारी सातारा विकास आघाडीत जोरदार घमासान झाले. नगरसेवकांनी  खा. उदयनराजे भोसले तसेच आ. शिवेंद्रराजे भोसले यांच्या उखाळ्यापाखाळ्या काढल्या. विकासकामांच्या प्रस्तावातील त्रुटी दाखवत साविआने नविआचे विषय पत्रिकेवरील तीनही विषय बहुमताच्या जोरावर रद्द केले. पालिकेत नविआकडे प्रभावी वक्ते नसल्याने विशेष सभा घेऊनही काहीच हाशील करता न आल्याने विरोधकांवर नामुष्की ओढवली.

सातारा नगरपालिकेची विशेष सभा छत्रपती शिवाजी सभागृहात सातार्‍याच्या प्रांताधिकारी डॉ. स्वाती देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सभेच्या सुरुवातीला ऐनवेळच्या विषयांना देशमुख यांनी परवानगी नाकारून विषयपत्रिकेवरील विषयांना सुरुवात केली. रामाचा गोटमधील जागेमध्ये बहुद्देशीय हॉल व व्यायामशाळा बांधण्यासाठी कामाचा प्रस्ताव     जिल्हा प्रशासन अधिकार्‍यांना सादर करण्यावर चर्चा सुरु झाली.  प्रस्ताव देवूनही नविआने सूचना देण्याऐवजी उपसूचना दिल्याने काहीवेळ गोंधळ निर्माण झाला. या विषयाच्या अनुषंगाने असलेली सूचना   विरोधात असल्याने नविआने आक्रमक पवित्रा घेतला. नगरसेवक रवींद्र ढोणे म्हणाले, नियोजित जागेवर असलेल्या शौचालयाची दुरावस्था झाली आहे. त्याचा पुरेसा वापरही होत नाही. व्यंकटपुरा पेठेत मल्टिपर्पज हॉल बांधून दिला जात असताना रामाचा गोट येथील काम जाणीवपूर्वक हाणून पाडले जात आहे.  विरोधी पक्षतेने अशोक मोने म्हणाले, एवढी नालस्ती होवूनही सत्ताधार्‍यांकडून सूचना दिल्या जात आहेत. या सभागृहात नामवंत नगराध्यक्ष होवून गेले. श्री. छ. दादामहाराज, श्रीमंत शिवाजीराजे भोसले यांनी सभागृहाचे कामकाज चालवले. त्यावेळीही विरोधक होते. दादामहाराज नगराध्यक्ष असताना विरोधकांनी त्यांची गाडी काढून घेतली होती. पण त्यावेळी सुध्दा अशी परिस्थिती निर्माण झाली नाही. सत्ताधार्‍यांना त्याचे काहीही वाटत नाही. विरोधी नगरसेवकांची कामेच करायची नसतील तर आमच्या प्रभागात तसे बोर्ड लावावेत. नागरिक टॅक्स भरत असल्याने त्यांची कामे झाली पाहिजेत. सत्ताधार्‍यांची दंडेलशाही, हुकूमशाही अजिबात चालू देणार नाही. वैयक्तिक शौचालय बांधण्यासाठी सरकार अनुदान देत असताना रामाचा गोट येथे नगरपालिका का खर्च करते. हॉल तसेच व्यायामशाळेसाठी डीपीडीसी निधी देत असताना त्याला विरोध कशासाठी?  लोकनियुक्त नगराध्यक्षा सभागृहातील अशा दंडेलशाही आणि दादागिरीमुळे उपस्थित राहू शकल्या नाहीत. त्यांची अशी अवस्था असेल तर इतरांचे काय? अशी टीका मोने यांनी केली. त्यामुळे साविआचे नगरसेवक चिडले.   उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के, नगरसेवक राजू भोसले, यशोधन नारकर, श्रीकांत आंबेकर आक्रमक झाले. आघाडीवर बोलू नका विषयपत्रिकेवर बोलावे, असे त्यांनी सुनावले आणि वाद निर्माण झाला.  अमोल माहिते, रवींद्र ढोणे यांनी यावेळी बाजू सावरुन नेली. नियोजित हॉलच्या जागेत सार्वजनिक शौचालय असून ते पाडल्याने नागरिकांची गैरसोय होणार आहे. शिवाय ती जागा पुरेशी नाही. आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केलेली नाही. शौचालय पाडण्यास परवानगी घेतलेली नाही.आर्किटेक्टचा प्लॅन नाही. प्रस्ताव त्रुटी असल्याचे सांगत सुहास राजेशिर्के यांनी विषय मंजूर करण्यास  विरोध केला. श्रीकांत आंबेकर म्हणाले, विरोधकांनी सभेत सातत्याने दंगा करुन नगराध्यक्षांचा राजीनामा मागून दंडेलशाहीचा प्रयत्न केला. मागील बजेट मंजूर होवू नये म्हणून प्रयत्न केले. त्याचा विकासावर परिणाम झाला. आंबेकरांनी जुने विषय काढल्याने दोन्ही आघाड्यांच्या नगरसेवकांमध्ये हमरीतुमरी झाली. कुणाचा विकास सुरु आहे हे सातारकर बघत आहेत. लोकांचीच कामे करणार तुमच्यासारखे त्यांच्या डोक्यावर पाय देवून जाणार नाही. माहिती घेवून बोलावे, अशा शब्दांत मोनेंनी सुनावले. साविआने हा विषय मंजुरीसाठी  मतदान घेण्याची मागणी केली.  नविआने मांडलेली उपसूचना 22 विरुध्द 10 ने साविआने फेळाटून लावली. विषय रद्द करण्यात आला.डॉ. स्वाती देशमुख यांनी सूचना मंजूर केली.  

मंगळवार पेठेतील दुर्गम भागात करण्यात येणार्‍या काँक्रेट पायर्‍यांच्या कामांस मंजुरी देण्यावर चर्चा झाली. मात्र, हे काम ग्रीन झोनमध्ये तसेच शहर हद्दीबाहेर असल्याचे कारण सांगत साविआने हा विषय रद्द करण्याची मागणी केली. त्यावेळी अशोक मोने म्हणाले, विरोधकांच्या कामांना खोडा घालण्याचे काम सुरु असून साविआ सातारकरांना त्रास देत असल्याचे सांगितले. रवींद्र ढोणे म्हणाले, हा परिसर ग्रीन झोन असता तर त्याठिकाणी लेआऊट मंजूर झाले नसते. वॉर्ड फंडातील हा विषय असल्याने मंजूर करावा, अशी मागणी  त्यांनी केली. वसंत लेवे म्हणाले,  संबंधित जागा सिटी सर्व्हेची नावे. बेकायदा बाबींना सभागृहात परवानगी मिळणार नाही. अधिवेशनात तारांकित प्रश्‍न उपस्थित करा किंवा लक्षवेधी लावा. चुकीची कामे केली जाणार नाहीत. आमदार विधानसभेत बोलतात तशी निवेदने देतात, अशी लेवेंनी टीका केली. त्यावर नविआचे नगरसेवक आक्रमक झाले. खासदारांची जवळीक वाढवण्यासाठी आमदारांची बदनामी करु नका. विषयाला अनुसरुन बोला, अशा शब्दांत मोने, मोहिते, मोरे यांनी लेवेंना दम दिला आणि याप्रकरणी त्यांनी नगररचना विभागाला खुलासा करण्याची मागणी केली. मोने म्हणाले,  बजेट कुणाच्या दहशतीखाली मंजूर झाले हे सातारकरांना माहित आहे. सभेत बोलू न देता गोंधळ घालता. त्यामुळेच आमदारांना पत्र देवून विशेष सभा घ्यावी लागली असे सांगतानाच अ‍ॅड. दत्ता बनकर यांनी विषयांतर नको, तुम्हाला काय कळतं, अशी टीका  केली. त्यामुळे मोने संतापले. तुम्हाला लय कळतं म्हणून स्वीकृत म्हणून घेतलंय. जनतेनेही दाखवून दिले आहे. तिथे दादागिरी चालत नाही पण इथे चालते. त्यासाठीच तुम्ही इथं आलाय, असे सुनावले. नगररचना विभागाकडून खुलसा झाला नाही. हा विषय मंजुरीसाठी मतदान झाले. नविआने मांडलेली उपसूचना 22-11 ने साविआने फेटाळून लावली. सूचना कायम ठेवत विषय रद्द करण्यात आला. 

शहरातील विविध विकासकामांचा जिल्हा नियोजन विकास आराखड्यात समावेश करुन येणार्‍या खर्चास मंजुरी देण्याच्या विषयांवरही साविआने सूचना केली. ठराविक भागातील विषय घेतले गेल्याने शहरातील उर्वरित भागावर अन्याय होणार आहे. या विषयांच्या अनुषंगाने आमदारांनी कधी पत्र दिले. टिपण्या कधी तयार करण्यात आल्या. याचा तपशिल वाचावा, असा उल्लेख लेवे यांनी करताच मोने आणि मोहिते आक्रमक झाले. त्यांनी अध्यक्षांकडे लेवेंची तक्रार केली. अ‍ॅड. बनकर म्हणाले,  शहराचा विकास खुंटला म्हणून विरोधक सांगत असताना शहरातील 12 वॉर्डमधीलच विकासकामे मंजुरीसाठी का आणली? अशापध्दतीने उर्वरित शहरावर अन्याय केला जात आहे. भाजप नगरसेवकांचा विकास आम्हीच करणार आहोत. शहरात 700 कोटींची कामे सुरु असून ती विरोधकांना पाहवत नाहीत. बजेट मंजूर केले असते तर अशी सभा घेण्याची वेळ आली नसती. नागरिकांना विकासापासून वंचित ठेवले जात असून विरोधकांचे विषय कायद्याला धरुन आहेत का? हे पाहणे गरजेचे आहे, असे ठणकावले.
शेखर मोरे म्हणाले, नगरपालिकेने  हद्दीबाहेर असणार्‍या गोडोली तळ्यावर 25 लाख खर्च केले. लाईटवर 6-7 लाख, सार्वजनिक शौचालयावर 5-6  लाख खर्च केले. पण भिंतीचे काम हद्दीबाहेर आहे असा शोध लावला  जात आहे. राजकीय संघर्ष निवडणुकीपुरताच ठेवावा. विरोधकांचे विषय जाणीपूर्वक हाणून पाडले जात आहेत. आकस न ठेेवता सत्ताधार्‍यांनी आदर्श कारभार करुन दाखवावा, असा सल्ला दिला. अशोक मोने म्हणाले, प्रशासन अर्धवट प्रस्ताव तयार करत असेल तर तुमचे त्यांच्यावर किती कंट्रोल आहे हे दिसते. किंबहुना कारभाराचे हे द्योतक आहे. सातारकरांवर तुमची दहशत आहे. चेल्यांनी उगीच मापे काढायला लावू नयेत. वरचा कोट काढून ठेवला तरी बाकी पोशाख काळाच आहे, अशी टीका मोने यांनी बनकर व लेवेंवर केली. कमी उंचीच्या आणि पात्रता नसणार्‍या लोकांनी आमची कामे थांबवली, अशा शब्दांत लेवे यांनी टीका केली.  सूचना मतदान घेतल्यावर हा विषय  22-11 मतांनी साविआने रद्द केला.