होमपेज › Satara › जिल्ह्यात महिला अत्याचार विशेष तपास पथक

जिल्ह्यात महिला अत्याचार विशेष तपास पथक

Published On: Apr 26 2018 2:04AM | Last Updated: Apr 25 2018 9:14PMसातारा : मीना शिंदे

वाढत्या महिला अत्याचारांच्या घटनांना आळा घालून दाखल गुुन्ह्यांचा तपास गतीने होण्यासाठी आता केंद्र व राज्य शासनाच्यावतीने जिल्हास्तरावर ‘महिला अत्याचार तपास पथक’ स्थापन होणार आहे. महिलांबाबत देशभरात वातावरण अतिशय संवेदनशील बनले असून मुली, महिला असुरक्षित असल्याचेच वातावरण आहे. दरम्यान, या पार्श्‍वभूमीवर महिलांबाबत गुन्ह्यांचा तपास  गतीने होणार असल्याने महिला वर्गातून केंद्र व राज्य शासनाच्या या निर्णयाचे स्वागत होत आहे.

अलिकडच्या काळात महिलांचा विनयभंग, बलात्कार, कौटुंबिक हिंसाचार व महिलांना आत्महत्येस प्रवृत्त करणे इत्यादी प्रकारच्या  घटनांमध्ये  दिवसेंदिवस वाढ होत आहे.  वारंवार घडत असलेल्या अशा प्रकारच्या घटनांचा सखोल व परिपूर्ण पद्धतीने तपास झाला पाहिजे. या तपासावर देखरेख ठेवून आरोपींविरुद्ध तात्काळ खटले दाखल करणे आवश्यक असल्याने  महिलांवरील अत्याचार विशेषत: बलात्कार, हुंडाबळी, अपहरण, अनैतिक व्यापार आणि घरगुती हिंसाचार इत्यादी गुन्ह्यांबाबत जिल्हास्तरावर तपास पथके गठीत करण्यात येेणार आहेत. याबाबतचा अध्यादेश राज्य शासनाच्यावतीने जाहीर करण्यात आला आहे. 

सातारा जिल्ह्यातही महिला अत्याचाराच्या  घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे.  आता नव्याने आलेल्या अध्यादेशामुळे जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या  मार्गदर्शनाखाली  स्वतंत्र महिला पोलीस तपास पथक स्थापन करण्यात येणार आहे. या पथकामध्ये  पोलिस उपअधीक्षक दर्जाचा एक अधिकारी तसेच  आर्थिक गुन्हे यांची प्रमुख नियुक्ती असणार आहे. तसेच  पोलीस महासंचालकांकडून त्यांच्या आस्थापनेवर मंजूर असलेल्या उपलब्ध पदांमधून महिला अत्याचार तपास पथक कार्यान्वित होणार आहे. जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली निर्माण करण्यात  येणारे महिला अत्याचार पथक दोन गटांमध्ये कार्यरत राहणार आहे. दुसर्‍या गटात पोलिस निरीक्षक दर्जाचे अधिकारी काम करतील. तसेच या  दोन्ही गटांवर पोलिस अधीक्षकांनंंतर पोलीस उपअधीक्षक दर्जाच्या अधिकार्‍यांचे नियंत्रण राहणार आहे. 

महिला अत्याचार तपास पथकाकडून   बलात्कार,  अपहरण, विनयभंगाचे प्रकार आणि महिलांवरील इतर गंभीर गुन्हे तसेच हुंडाबळी, हुंड्याशी संबंधित आत्महत्या आणि हुंडा प्रतिबंधक  कायद्यांतर्गत उद्भवणारे इतर गुन्हे, भारतीय दंड संहितेच्या कलम 498(अ) अंतर्गत येणारे गुन्हे, कौटुंबिक हिंसाचाराच्या गुन्ह्यांबाबत कारवाई केली जाणार आहे. दरम्यान, मुली व महिलांना समाजात सुरक्षितता वाटावी, अन्याय व अत्याचार झाल्यानंतर कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होऊन दोषींना कठोर शासन  होण्यासाठी या पथकाने कार्यरत राहण्याची गरज आहे. 

तपास पथकाची कामे

महिला व बालकांवरील गुन्हांच्या सद्यस्थिती संदर्भात आढावा घेणे व वेळेवर दोषारोप पत्र पाठवण्यासंदर्भात पाठपुरावा करणे,अपराधसिद्धता वाढवण्यासाठी उपाययोजना करणे, केंद्र व राज्य शासनाने महिला अत्याचार व गुन्ह्या संदर्भातील अधिनियमातील तरतुदींची अंमलबजावणीसाठी कार्यवाही, महिला अत्याचाराच्या दाखल गुन्ह्याच्या तपासाचे संबंधितांना प्रशिक्षण देणे, महिला संरक्षणाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना सुचवणे, त्याबाबत जागरूकता वाढवण्यासाठी कार्यशाळा, चर्चासत्र व विशेष मोहीम राबवणे, महिलांच्या संरक्षणासंदर्भात कार्यरत स्वयंसेवी संस्थांशी समन्वय साधून त्यांना सहकार्य व मार्गदर्शन करणे, यासंदर्भात पोलिस महासंचालकांच्या सूचनांची अंमलबजावणी करुन अहवाल सादर करणे, महिला अत्याचाराबाबत दाखल होणार्‍या गंभीर गुन्ह्यांचा  तपास करणे.

 

Tags : satara, satara news, Women atrocities, Special investigation team,