होमपेज › Satara › सभापतींवर तलवार हल्ल्याचा प्रयत्न

सभापतींवर तलवार हल्ल्याचा प्रयत्न

Published On: Jul 28 2018 1:41AM | Last Updated: Jul 27 2018 10:55PM



औंध : वार्ताहर

सातारा जिल्हा परिषदेचे  समाजकल्याण सभापती शिवाजीराव सर्वगोड यांना तलवारीचा धाक दाखवून खंडणीसाठी धमकी दिल्याप्रकरणी  येळीव येथील एका युवकास औंध पोलिसांनी अटक केली आहे. 

याबाबत औंध पोलिस स्टेशनमधून मिळालेली अधिक माहिती अशी, शुक्रवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास शिवाजी सर्वगोड हे येळीव येथील त्यांच्या लव्ही नावाच्या शेतातील घरात एकटेच होते. यावेळी गावातील अमोल विष्णू घाडगे हा हातात तलवार घेऊन त्या ठिकाणी आला व  सभापतींना म्हणू लागला की, तू सभापती झालास म्हणजे काय झाले असे ओरडून  सभापतींकडे पन्नास हजार रूपये मागितले. त्यानंतर वस्तीवरून जात असताना वस्तीवरील प्रमोद जगताप  याने अमोल यास विचारले की, ‘तू तलवार घेऊन का आला आहेस?’ त्यावेळेस तो म्हणाला की, ‘मी हप्ता गोळा करायला आलो आहे.’

त्यानंतर काही वेळाने शिवाजी सर्वगोड  टाकीवर  अंघोळ करण्यासाठी गेले असता पाच मिनीटानंतर अमोल परत त्याठिकाणी दुचाकीवरून आला व त्यांना म्हणाला, ‘मी आज तलवार घेऊन आलो आहे,  दोन दिवसांनी घोडा  घेऊन येणार आहे, तू व तुझ्या घरातील सर्वांना संपवून टाकणार आहे.  तू प्रत्येक महिन्यास दहा हजार रुपये दिले नाही तर मी तुला संपवून टाकीन,’ असा दम देऊन तेथून निघून  गेला. याबाबतची  फिर्याद शिवाजी सर्वगोड यांनी औंध पोलीस स्टेशनमध्ये दिली आहे. घरात घुसून आपल्या खिशातील सात हजार रुपये अमोल घाडगे याने चोरून नेल्याचे शिवाजी सर्वगोड यांनी फिर्यादित म्हटले आहे.  

या घटनेची नोंद औंध पोलीस स्टेशनमध्ये झाली असून घटनास्थळी सपोनि सुनील जाधव यांनी भेट देऊन पाहणी केली आहे. याप्रकरणी अमोल घाडगे यास अटक करण्यात आली आहे. दरम्यान या घटनेमुळे खटाव तालुक्यासह जिल्हयाच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.