Thu, May 23, 2019 14:33
    ब्रेकिंग    होमपेज › Satara › जिल्ह्याच्या लौकिकात आणखी एक मानाचा तुरा

जिल्ह्याच्या लौकिकात आणखी एक मानाचा तुरा

Published On: Jan 09 2018 1:36AM | Last Updated: Jan 08 2018 10:08PM

बुकमार्क करा
सातारा : प्रविण शिंगटे

ग्रामपंचायतीने मोठ्या कष्टाने व ध्येयाने वाटचाल करत उभारलेला  घनकचरा व सांडपाणी प्रकल्प आदर्श ठरल्यानंतर त्याची दखल राज्य शासनाने घेवून तोच  प्रकल्प पथदर्शी म्हणून घोषित केला आहे. हा बहुमान सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील बनवडी गावाला मिळाल्याने जिल्ह्यासाठी ही अभिमानाची बाब आहे. राज्य शासनाच्या संकल्पनेतून राबवण्यात येणार्‍या योजनेसाठी बनवडी ग्रामपंचायतीचे पदाधिकारी या पथदर्शी प्रकल्पाबाबत राज्यातील जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना मार्गदर्शन करणार आहेत.
घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनांतर्गत बनवडी ग्राम पंचायतीने घनकचर्‍याचा आदर्श प्रकल्प तयार केला आहे. या प्रकल्पास राज्य शासनाच्या पाणी व स्वच्छता  विभागाच्या वतीने  राज्यस्तरीय प्रतिनिधी अरुण रसाळ यांच्या नेतृत्वाखालील पथकाने भेट दिली. या प्रकल्पाची पाहणी करून ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व ग्रामसेवकांकडून माहिती जाणून घेतली. या ग्रामपंचायतीमार्फत घरगुती स्तरावर कचर्‍याचे  ओला व सुका असे वर्गीकरण केले जाते. तसेच ओल्या कचर्‍यापासून गांडूळखत निर्मिती व सुका कचरा पुनर्निर्मितीसाठी दिला जात आहे. 

बनवडी ग्रामपंचायतीने कमी खर्चामध्ये घनकचर्‍याचा राबवलेल्या उपक्रमाचे पथकाने कौतुक तर केलेच पण राज्यातील इतर ग्रामपंचायतींसाठी हा उपक्रम फायदेशीर ठरणार असल्याने राज्य शासनाकडे तशी शिफारसही केली. या उपक्रमाची नोंद महाराष्ट्र शासनाच्या पाणी व स्वच्छता विभागाने घेतली असून यापुढे सांडपाणी व घनकचरा या विषयाचे धोरण ठरवताना बनवडीचा आदर्श उपक्रम डोळ्यासमोर ठेवून मार्गदर्शक सूचना तयार करण्यासाठी बुधवारी मुंबई येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

घनकचरा व्यवस्थापन पथदर्श प्रकल्प राबविण्यासाठी सातारा, नांदेड,  वाशिम, वर्धा, ठाणे व पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी  यांना बैठकीस निमंत्रित करण्यात आले असून बनवडी ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व ग्रामसेवक मार्गदर्शन करणार आहेत.

दरम्यान, एकीकडे जिल्हा हागणदारीमुक्तीकडे वाटचाल करत असताना  घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनात अपेक्षित यश प्राप्‍त झालेले नाही.  बनवडीचा अपवाद वगळता जिल्ह्यातील इतर ग्रामपंचायतींमध्ये हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा परिषदेची यंत्रणा झटत आहे. सांडपाणी प्रक्रीयेसाठी येणारा प्रचंड खर्च किंवा तंत्रज्ञान वापरताना येणारी जागेची अडचण, तर घनकचरा व्यवस्थापनासाठी कचर्‍यांच्या वर्गीकरणाबाबतच्या जागृकतेचा अभाव यामुळे इतर ग्रामपंचायतींच्या परिसरामध्ये ठिकठिकाणी कचर्‍याचे ढिग आढळून येत आहेत. या सर्व गोष्टीचा अभ्यास करून जिल्ह्यातील 3 हजार पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या 217 गावांची निवड करून त्या ग्रामपंचायतीमध्ये मुख्य कार्यकारी डॉ. कैलास शिंदे यांच्या नेतृत्वाखाली घनकचरा व सांडपाणी प्रकल्प सुरू करण्यात आला आहे.

गावच्या सरपंच व ग्रामसेवकांना बनवडी येथे सांडपाणी व घनकचर्‍याबाबत मार्गदर्शन करण्यात आले असून संबंधित ग्रामपंचायतीमध्ये प्रकल्प उभारण्याची कार्यवाही सुरू झाली आहे.
- चंद्रशेखर जगताप

उपमुख्य कार्यकारी अधिकारी