Thu, Jul 18, 2019 21:31होमपेज › Satara › सोशल मीडियाही झाला आहे मराठामय 

सोशल मीडियाही झाला आहे मराठामय 

Published On: Jul 28 2018 1:41AM | Last Updated: Jul 27 2018 10:50PMशाहूपुरी : अमित वाघमारे

मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, या मागणीसाठी सातारा जिल्ह्यातील मराठा समाज बुधवारी पुन्हा एकवटला असून यात युवा वर्ग सर्वाधिक आक्रमक झालेला दिसून आला. कालच्या आंदोलनाचे पडसाद सोशल मीडियावरही उमटले होते. सोशल मीडियावर ‘एक मराठा लाख मराठा’ या घोषणेच्या पोस्ट गेल्या दोन-तीन दिवसांपासून फिरत राहिल्याने अवघा सोशल मीडिया मराठामय झाला होता.

सातार्‍यात बुधवारी मराठा क्रांती ठोक महामोर्चा पार पडला. या मोर्चात विशेषत: तरुणाई सर्वाधिक आक्रमक झालेली दिसून आली. ज्याप्रमाणे रस्त्यावर मराठा तरूण एकत्र आला होता. त्याचप्रमाणे दिवसभरही सोशल मीडियावरही मराठा तरूण आक्रमक झालेला दिसून येत होता. मराठा आरक्षणासंदर्भात सोशल मीडियावरही सर्वांनी एकत्र येण्यासाठी आवाहन करत होते. तसेच कुणीही कोणत्याही इतर समाज, जातीविषयी आक्षेपार्ह पोस्ट करू नका, असेही आवाहन मराठा समाजातील तरूणांकडून करण्यात येत होते.

अवघ्या सोशल मीडियावर गेल्या दोन - तीन दिवसातील घडामोडीचे फोटो, व्हिडिओे शेअर करून जे लोक सणानिमित्त मोर्चाला येवू शकले नव्हते त्यांना माहिती पुरवत होते. ‘मराठा क्रांती मूक मोर्चा’चा लोगो आपल्या प्रोफाइल फोटोमध्ये लावण्यामध्ये मराठा तरूणाई आघाडीवर होती. अनेकांच्या व्हॉटस्अ‍ॅप प्रोफाईलवर भगवा फड्या डोक्याला बांधलेेला व तलवार उंचावलेला मराठा युवक  झळकत होते. याशिवाय मराठा क्रांती मोर्चाचा लोगोही अनेक युवक युवतींनी  प्रोफाईलवर ठेवला होता.  सातार्‍यासह राज्यातील ठिकठिकाणच्या आंदोलनाबाबतची माहिती  संकेतस्थळाच्या लिंकद्वारे घेतली जात होती. 

मोर्चा व जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील ठिय्या आंदोलनाचे फोटो, व्हीडीओ सोशल मीडियावरुन व्हायरल होवू लागले. त्यानंतर जिल्ह्यात ठिकठिकाणी सुरु असलेल्या आंदोलनाचे फोटो, व्हिडीओ व्हायरल होत राहिल्याने सोशल मीडियावरील प्रत्येकाचे अकौंटही भगवे झाले होते. काही कारणास्तव मोर्चात न आलेल्यांना ही अलोट गर्दी याची डोळा अनुभवता आली. या गर्दीस सॅल्युट देत अनेक प्रतिक्रिया येवू लागल्या अन् राजधानीतील मोर्चाची लाट ओसरल्यावरही सोशल मीडियावरुन वादळी चर्चा सुरूच राहिल्याचे दिसून आले.