Fri, Apr 19, 2019 11:58होमपेज › Satara › सातार्‍यात सामाजिक सलोखा रॅली

सातार्‍यात सामाजिक सलोखा रॅली

Published On: Jan 05 2018 1:27AM | Last Updated: Jan 04 2018 10:07PM

बुकमार्क करा
सातारा : प्रतिनिधी

राज्यभरात गेल्या तीन दिवसांपासून जाती-धर्माच्या नावाखाली असंतोष पसरला असून ठिकठिकाणी उद्रेक झाले. या पार्श्‍वभूमीवर सातारा शहरातून विविध सामाजिक संघटना व सर्व राजकीय पक्ष, पत्रकार तसेच नागरिकांनी भव्य सामाजिक सलोखा रॅली काढून सामाजिक एकता कायम ठेवण्याचा संदेश दिला. 

सातारा शहरातील शाहू चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास गुरुवारी सकाळी नगराध्यक्षा सौ. माधवी कदम, उपनगराध्यक्ष राजू भोसले, माजी आमदार लक्ष्मण माने, जिल्हा पोलिस प्रमुख डॉ. संदीप पाटील, रिपाइंंचे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड, भाजपाचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, शिवराज्याभिषेक समितीचे दिपक प्रभावळकर, मुस्लिम संघटनेचे नेते सादिकभाई शेख यांनी पुष्पहार अर्पण केला. यानंतर सलोखा रॅलीस प्रारंभ झाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा शिवतीर्थ पोवईनाका या मार्गाने काढण्यात आलेल्या सामाजिक सलोखा रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

भारत माता की जय, शिवाजी महाराज की जय, हम सब एक है, वंदे मातरम् आदी घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. रॅलीत लालबहाद्दुर शास्त्री महाविद्यालय, कला वाणिज्य महाविद्यालय, यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालय, छ. शिवाजी कॉलेजचे एनएसएस  व एनसीसीचे विद्यार्थी तसेच विविध संघटना व पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.