Sat, Jun 06, 2020 01:32होमपेज › Satara › सातारा जिल्ह्यात गुटख्याचे ‘स्मगलिंग’

सातारा जिल्ह्यात गुटख्याचे ‘स्मगलिंग’

Published On: Nov 01 2018 1:05AM | Last Updated: Oct 31 2018 10:19PMसातारा : विठ्ठल हेंद्रे

सातारा शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागाच्या कानाकोपर्‍यात गुटखा तेजीत असून आजही बंदी असलेल्या गुटख्याची ठराविक ठिकाणी भरगच्च गोडावूनच भरलेली आहेत. गुटख्याला सोन्याचा भाव असल्याने त्याचेही अक्षरश: ‘स्मगलिंग’ होत असून त्याचा ‘स्टॉक’ करण्यासाठी सातार्‍यात भन्‍नाट आयडिया वापरल्या जात आहेत. दरम्यान, गेल्या महिन्याभरातील गुटख्यावरील कारवाईने गुटखा मार्केटमध्ये असल्याचे स्पष्ट झाले आहे. या पार्श्‍वभूमीवर अन्‍न औषध व पोलिसांना गुटख्याचे अड्डे उद्ध्वस्त करण्याचे आव्हान समोर उभे राहिले आहे.

गेल्या महिन्याभरात  वेगवेगळ्या धाडीमध्ये लाखो रुपयांचा गुटखा जप्‍त करण्यात आला आहे. सहा वर्षांपूर्वी राज्य शासनाने तंबाखूजन्य गुटख्यावर बंदी घातली असताना तो सहा वर्षानंतरही मिळत असल्याचे या कारवाईतूनच समोर आले आहे. सद्यस्थितीला मेट्रो सिटी, शहर व ग्रामीण भागासह बहुतेक भागात गुटखा विक्रीसाठी असल्याचे भीषण वास्तव आहे. बंदी आदेशामुळे उलट ब्लॅकने या गुटख्याचे दर गगनाला भिडले आहेत. तरीही हाय प्रोफाईल लोक एकाचवेळी गुटख्याच्या माळा घेवून खात आहेत. काही पान टपर्‍यांमध्ये तर गुटख्याची कमाई एकाबाजूला इतर बाकी कमाई एका बाजूला केली तर  गुटखा विक्रीच सरस असल्याचे स्पष्ट आहे. गुटखा स्टॉक करुन ठेवला जात असून त्याची वाहतूक करुन तो पानटपर्‍यांपर्यंत पोहचवला जात आहेे. तीन ते चार टप्प्यात गुटख्याची अशाप्रकारे वाहतूकव विक्री होत आहे. यातील पान टपर्‍यांवर व मुख्य म्हणजे ज्या ठिकाणी गुटख्याचा साठा आहे तेथे अभावानेच कारवाई झालेली आहे. साठा ते विक्री यापर्यंतचे गुटख्याचे राजरोसपणे स्मगलिंग होत आहे. गुटखा साठा असलेल्या ठिकाणी पोलिस व अन्‍न औषध प्रशासनाची यंत्रणा पोहचत नाही.

गुटख्याची वाहतूक होताना महामार्ग ट्राफिक पोलिसांना तो गुटखा दिसत नाही. अशाप्रकारे गुटखा ‘स्मगलिंग’ होण्यासाठी एकप्रकारे अर्थपूर्ण सहाय्य होत आहे. मार्केटमध्ये सध्या तीन ते चार प्रकारचा गुटखा मिळत आहे. यामधील सर्व गुटख्याची विक्री मूळ किंमतीच्या पाचपट दराने केली जात आहे. यामुळे गुटख्यातील ब्लॅक विक्रीही तेजीत आहे. गुटखा विक्री करताना पानटपरी व तो विक्री करणारे हुशारीने विकत आहेत. ठराविक व ठरलेल्या ग्राहकांनाच गुटख्याची इमानेइतबारे विक्री होत आहे. यामुळे कारवाई होण्यापासून टाळले जात आहे. मात्र, स्थानिक प्रशासनाला याबाबत माहिती असल्याचे वास्तव आहे. धक्‍कादायक बाब म्हणजे कारवाई टाळण्यासाठी ‘मंथली’ पोहच होत असल्याने गुटखा टोळीचे फावत आहे. गुटखा वाहतूक करताना तो अलिशान कारमधून तसेच मालवाहतूक करणार्‍या वाहनांचाही समावेश आहे. मालवाहतूक करणार्‍या वाहनांमध्ये तळात गुटख्याची पिशवी, बॅग ठेवली जात आहे. यामुळे गुटख्याचा वास बाहेरपर्यंत येण्यास अडथळा निर्माण होतो. अशाप्रकारे गुटखा विक्री ते अड्डा या प्रवासात अड्ड्यावरील कारवाईला बगल मिळत असून बहुतांशी कारवाईत हा गुटखा शेजारील राज्यातून आणला असल्याचे तपासात समोर येत असल्याचे उत्तर देवून प्रकरण रफादफा केले जाते.

गुटख्यामध्ये अशी होतेय तोडपाणी..

शासनाने बंदी असलेला गुटखा अनेकांच्या आशीर्वादाने सुरु आहे. पोलिस किंवा अन्‍न औषध विभागाने गुटख्यावर कारवाई केली तर तेवढ्यापुरतीच मर्यादीत राहते. वास्तविक तो गुटखा कुठून आणला? कुठे जाणार आहे? ज्या ठिकाणावरुन गुटखा आला तेथे किती शिल्‍लक आहे? जेथे जाणार आहे तेथे अगोदरच किती शिल्‍लक आहे? अशा विविध प्रश्‍नांची उत्तरे समोर येणे गरजेचे असताना तसे होत नाही. या साखळीतील इतरांना ‘सेफ’ करण्यासाठी आर्थिक देवाणघेवाणची हित पाहिले जाते व तोडपाणीनंतर प्रकरण रफादफा होते. यामुळे गुटखा बंदी अद्यापतरी कागदोपत्रीच आहे.

गुटख्याचा कायदा कडक पण..

महाराष्ट्र शासनामध्ये आघाडीचे सरकार असताना 13 जुलै 2012 मध्ये अथक प्रयत्नानंतर गुटखा बंदीवर शिक्‍कामोर्तब झाले. तंबाखूजन्य गुटख्याविरुध्द लढा देणार्‍यांनी त्यावेळी जल्‍लोष केला. गुटख्याचा कायदा तयार झाल्यानंतर चोरटा गुटखा विक्री जोरातच सुरु असल्याचे अनेक कारवाईमधून समोर आले आहे. यामुळेच अखेर गुटखा विक्री, बाळगणे हा गंभीर गुन्हा आहेे. मात्र ,अनेकदा कारवाई करणार्‍या पथकावर गुन्हा दाखल होत असल्याचे भीषण वास्तव आहे. साधासरळ गुन्हा दाखल झाला तर तो बेलेबल (जामीनपात्र) गुन्हा ठरतो. मात्र नियमित कलमाबरोबरच जर 328 हे कलम लावले तर तो नॉनबेलेबल (अजामीनपात्र) गुन्हा ठरतो. दुर्देवाने मात्र कारवाईमध्ये हे कलम सोयीस्कररित्या टाळले जात आहे. दरम्यान, दोन वर्षापासून ते दहा वर्षापर्यंत यामध्ये शिक्षेची तरतुद करण्यात आलेली आहे.