Mon, Aug 26, 2019 00:10होमपेज › Satara › सुलोचने, दातिरांची जेलमध्ये रवानगी

सुलोचने, दातिरांची जेलमध्ये रवानगी

Published On: Jul 22 2018 11:06PM | Last Updated: Jul 22 2018 10:56PMसातारा: प्रतिनिधी

औषध विक्री परवान्याचे नूतनीकरण करण्यासाठी सातारा येथील अन्‍न व औषध प्रशासन कार्यालयातील सहायक आयुक्‍त विनय दत्तात्रय सुलोचने (मूळ रा. ठाणे)  आणि आरोग्य निरीक्षक सविता भास्कर दातीर (मूळ रा. पुणे) यांना 20 हजार रुपयांची लाच स्वीकारताना सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शनिवारी रंगेहाथ पकडले. रविवारी दोघा संशयितांना जिल्हा न्यायालयात हजर केले असता कोर्टाने पुढील सुनावणी सोमवारी होणार असल्याचे सांगितले. यामुळे  दोघा संशयितांची सातारा कारागृहात (जेल) रवानगी करण्यात आली आहे. दरम्यान, सुलोचने व दातीर यांच्या घराची झडती घेवून संपत्तीची माहिती मिळवण्याची प्रक्रिया सुरु झालेली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, वाई येथील एका मेडिकलच्या दुकान चालकाने परवाना नुतनीकरणासाठी सातारा येथील अन्‍न व औषध विभागात अर्ज केला होता. तक्रारदाराने अर्ज केल्यानंतर तो परवाना देण्यासाठी सहाय्यक आयुक्‍त विनय सुलोचने व सविता दातीर यांनी त्यांच्याकडे 20 हजारांची लाच मागितली. याबाबत तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (एसीबी) तक्रार केली होती. त्यानुसार शनिवारीच एसीबीने कारवाई करुन दोघांना अटक केली. आयुक्‍त दर्जाचा अधिकारीच लाच घेताना पकडला गेल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली.

शनिवारी दुपारी कारवाई झाल्यानंतर रात्री सातारा शहर पोलिस ठाण्यात लालुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करुन एसीबीने संबंधित दोघांनाही अटक केली. रविवारी दोन्ही संशयितांना जिल्हा न्यायालयात हजर केल्यानंतर एसीबीच्यावतीने त्यांची पोलिस कोठडी मिळण्यासाठी युक्‍तिवाद करण्यात आला.  न्यायाधिशांनी पोलिस कोठडी फेटाळली व न्यायालयीन कोठडी सुनावली. यावेळी बचाव पक्षाकडून अ‍ॅड.चंद्रकांत बेबले व अ‍ॅड.महेश यादव यांनी युक्‍तिवाद केला. न्यायाधिशांनी पोलिस कोठडी नाकारल्यानंतर त्याबाबत सरकारी पक्ष व तपासी अधिकारी यांचे म्हणणे घेण्यासाठी सोमवारी पुढील तारीख दिली. त्यामुळे तोपर्यंत दोन्ही संशयितांची सातारा जेलमध्ये रवानगी करण्यात आली.

 दरम्यान, पुणे व ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्या त्या ठिकाणी दोघा संशयितांच्या घरावर छापे टाकले आहेत. छाप्याबाबत अधिक माहिती मिळू शकली नसून संपत्तीची माहिती घेण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे सांगण्यात आले आहे. या घटनेचा पुढील तपास पोनि आरिफा मुल्‍ला करत आहेत.