Fri, Jul 19, 2019 05:35होमपेज › Satara › कराड-चिपळूण महामार्गासाठी कायदे धाब्यावर 

कराड-चिपळूण महामार्गासाठी कायदे धाब्यावर 

Published On: Jan 18 2018 1:45AM | Last Updated: Jan 17 2018 9:00PM

बुकमार्क करा
पाटण : गणेशचंद्र पिसाळ

कराड-चिपळूण राज्यमार्गाचा राष्ट्रीय महामार्ग बनविण्यासाठी सध्या रस्त्याकडेच्या हजारो झाडांची राजरोसपणे कत्तल सुरू आहे. सह्याद्रि व्याघ्र प्रकल्प व कोयना अभयारण्य विभाग या मोठ्या कंपन्यांना रासाटी ते घाटमाथा या अंतरात बफर झोन व कॉरीडॉरमुळे वृक्षतोडीला पायबंद घालणार की पायघड्या घालणार या भूमिकेकडे पाटणवासियांचे लक्ष लागले आहे. 

कराड चिपळूण राज्यमार्गाचा राष्ट्रीय महामार्ग बनविण्यासाठी सध्या रस्त्याकडेच्या हजारो झाडांची राजरोसपणे कत्तल सुरू आहे. सध्या हे काम पाटण शहरापर्यंत पोहोचले आहे. लवकरच ते कोयना विभागाकडे जाणार आहे. तथापि कोयना विभागातील रासाटी ते घाटमाथा या अंतरात बफर झोन व चांदोली राष्ट्रीय उद्यान व कोयना अभयारण्य, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प यांना जोडणारा वन्यप्राण्यांचा भ्रमणमार्ग तथा कॉरिडॉर आहे. 

वर्षानुवर्षे जतन केलेली झाडे कत्तल करताना येथे रस्ता रुंदीकरण होऊन राष्ट्रीय महामार्ग झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर वाहतूक वाढणार आहे. यामुळे रस्ता ओलांडताना प्राण्यांच्या अपघाताची शक्यता आहे. त्यामुळे जमिनीखालून भुयारी मार्ग किंवा रस्त्यांच्या वरच्या बाजूला पूल करून आधी प्राण्यांची व नंतरच माणसांच्या वाहतुकीची सोय करणे गरजेचे आहे.  रुंदीकरणाच्या कामासाठी स्थानिक ठिकाणाहून मुरूम किंवा डबरही उत्खनन करता येणार नाही. 

अजूनतरी याबाबत कोणत्याही उपाययोजना केल्या नाहीत किंवा याठिकाणी रस्तारुंदीकरण अथवा वृक्षतोड यासाठी  परवानगी घेण्यात आलेली नाही. त्यामुळे याबाबत वन्यजीव व सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाची भूमिका तितकीच महत्त्वाची आहे. आजवर या विभागात कोयना अभयारण्य, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प, पश्‍चिम घाट व इको सेन्सिटिव्ह प्रकल्प यामुळे स्थानिकांचे जीवन उद्ध्वस्त झाले आहे. एखादी लाकडाची मोळी अथवा याच जंगलात फिरल्यामुळे शिक्षा करणारे हेच विभाग रुंदीकरणाच्या कामासाठी संबंधित कंपन्यांसाठी पायघड्या घालण्याच्या तयारीत आहेत असे दिसते.