फलटण प्रतिनिधी
फलटण येथील शिवाजी रोड बुधवार पेठेत महिला धुणे वाळत घालण्यासाठी गेली असता मोठ्या एचटी लाईन (टॉवर लाईन)चा शॉक बसून जाग्यावरच ठार झाली.
शोभा मनोज घाटे (वय 40) या घराच्या टेरेसवर सकाळी 6:45 च्या सुमारास धुणे वाळत घालण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी जवळून जाणार्या विद्युत तारेचा शॉक बसला. हाय व्होल्टेजची तार असल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनास्थळाचा पंचनामा झाला असून याबाबतची फिर्याद सचिन पांडुरंग घाटे यांनी दिली आहे. तपास पो.ह. गिरी करत आहेत.
दरम्यान, घटनेची जबाबदारी बांधकाम विभाग आणि महावितरण या दोघांची असून या दुर्दैवी घटनेनंतरही संबंधित विभागांना जाग येणार का असा सवाल नागरिकांतून उपस्थित होत आहे. सौ. शोभा यांना विद्युत धक्का बसलेली तार ही हायव्होल्टेजची होती. मोठ्या क्षमतेच्या घराच्या भिंतीशेजारून जात असल्याने अपघाताची शक्यता असते, याचा विचार संबंधित अधिकार्यांनी करण्याची गरज होती. त्यामुळे तातडीने माहिती घेवून अशा घरांशेजारील हायव्होल्टेजच्या विद्युत तारा काढण्याची गरज आहे.
तसेच फलटण नगरपरिषदेत पूर्ण वेळ काम करणारे बांधकाम अभियंताच नाहीत. यामुळे बांधकामे व्यवस्थित होतात का नाही हे पाहण्यासाठी कोणालाच वेळ नाही. यापुढे तरी बांधकाम अभियंता यांनी शहरातील बांधकामे होताना सर्व नियम पाळले जात आहेत, याची तपासणी करण्याची गरज आहे.