Wed, Mar 20, 2019 22:57होमपेज › Satara › टपर्‍यांचा  ‘सातारा’

टपर्‍यांचा  ‘सातारा’

Published On: Mar 13 2018 1:44AM | Last Updated: Mar 12 2018 8:27PMसातारा : प्रतिनिधी

पेन्शरांचा म्हणून ओळख असणार्‍या सातार्‍यात अलिकडे कोणकोणत्या नावाने संबोधले जाते याचा काही नेमच उरलेला नाही. अलिकडे अलिकडे तर सातार्‍याची चक्‍क ‘टपर्‍यांचा सातारा’ म्हणूनही ओळख रूढ होवू लागली आहे. शहरात कुठेही जा रस्तोरस्ती तुम्हाला टपर्‍या अन् खोक्यांचे पेवच फुटलेले दिसते. अनेक मार्गावरील पदपथ  विक्रेत्यांनी बळकावले आहेत. या अतिक्रमणांमध्ये मोठे अर्थकारण दडले असून कोणी स्थानिक फळकुटदादा  या ठिकाणी संबंधित  अधिकार्‍यांच्या  आशीर्वादाने  प्रोटेक्शन मनी गोळा करतो. त्यांच्या परवानगीशिवाय या ठिकाणी खोकच काय पथारीही पसरता येत नाही, हे उघड गुपित असून येथील विक्रेत्यांकडून गोळा होणारे हप्ते कोणत्या अधिकार्‍यांना जातात? ही आर्थिक साखळी तोडून रस्त्यावर आलेल्या पादचार्‍यांसाठी पदपथ रिकामा करण्याचे धाडस संबंधित प्रशासन दाखवणार का? असा सवाल सर्वसामान्यांतून उपस्थित केला जात आहे.

सातारा शहराला इनमिन दोनच प्रमुख रस्ते असताना दिवसेंदिवस त्यावरही अतिक्रमणे बोकाळली जात असल्याने रहदारीचा प्रश्‍न बिकट होत चालला आहे. अतिक्रमणांमध्ये प्रामुख्याने टपर्‍यांचे पेव सर्वाधिक प्रमाणात आहे. यातील बहुतांशी टपर्‍या जावून-येवून करतात. कारण आताच्या टपर्‍यांना चाके बसवली गेल्याने ते सहजासहजी कुठेही नेता येतात. यामुळे टपरी दिवसा रस्त्यावर रात्री घरी, अशी परिस्थिती असल्याने टपर्‍यांचे गणित मोठे वास्तव आहे.

आर्थिक नाड्या आवळण्याचे पोलिसांसमोर आव्हान 

सातार्‍यातून गुंडगिरी हद्दपार झाल्याचा दावा राजकीय व्यासपीठावरुन होतो. पण या परिसरातील हप्तेखोरांच्या कॉलरला हात घालण्याचे आणि त्यांच्या आर्थिक नाड्या आवळण्याचे आव्हान पोलिस दलासमोर असून हे आव्हान जिल्हा व पोलिस प्रशासन स्वीकारणार का? असा सवाल नागरिकांनी केला आहे.

अवैध व्यावसायिकांचे अड्डे 

अनेक टपर्‍यांमध्ये अवैध व्यावसायिकांचे अड्डे असल्याचे यापूर्वी अनेकदा दिसून आले आहे.  मटका, जुगार तसेच अवैध गुटखा विक्री याठिकाणी सर्रास होत असते. त्यामुळे जागांवर अतिक्रमण करून बेकायदा कामास प्रारंभ करणार्‍या या टपरीवर पुढे अनेक अवैध धंद्यांचे अड्डे बनत असतात. यातुनच पुढे पैशाच्या देवाण-घेवाणीतून हाणामार्‍या, गुंडगिरीचे प्रकार वाढून शहराची शांतता भंग पावत असते. टपर्‍यांमधून हप्‍तेखोरी व मोठी आर्थिक गणिते असल्याने हा धंदा तेजीत आला आहे. नगरपालिका दरवर्षी किरकोळच अतिक्रमण मोहीम राबवते मात्र त्यासाठीही पोलिसांचा चोख बंदोबस्त घ्यावा लागतो. यातूनच टपर्‍या चालवणार्‍या टोळ्यांची मुजोरी वाढली असल्याचे स्पष्ट आहे.

‘रस्ते का माल सस्ता’मुळे स्थानिकांवर गडांतर

 सातारा शहरात टपरीधारकांमध्ये अनेक परप्रांतियांचा समावेश आहे. कुठल्याही मोकळ्या जागेत अचानक एखादी टपरी उभी राहिलेली दिसते. त्यानंतर काही दिवसातच शेजारी इतर काही व्यावसायिक येवून तंबू ठोकतात. यामुळे इथला स्थानिक व्यावसायिक जो शासनाचे, नगरपालिकेचे कर हजारो रुपयांनी भरत असतो, त्याच्यावर अन्याय होत असतो. शिवाय दुकानातील कामगार व इतर सेवासुविधांवर केला जाणार खर्च पाहता त्याला टपरीवरील मालाच्या तुलनेत स्वस्त देता येत नाहीत. त्यामुळे रस्ते का माल सस्ता म्हणत हे परप्रांतिय टपरीवाले स्थानिकांचा घास अनेक वर्षांपासून गिळत असल्याचे भीषण वास्तव सातार्‍यातील रस्तोरस्ती  दिसत आहे.

अबब... टपर्‍या अन् खोक्यांची ओळमाळच की...

 अतिक्रमणावरुन सातार्‍यातील स्टँड परिसर व राधिका रस्त्याची आता अख्यायिका होवू लागली आहे. नव्याने विस्तारलेल्या रस्त्यावर पोवईनाक्याच्या सभापती निवासस्थानालगत तर टपर्‍यांची माळच लागली आहे. तसेच राधिका रस्त्यावरही शेतकरी, टपर्‍या, फळांचे गाडे दिसून येतात. आयजींचा दौरा असला की हा मार्ग मोकळा होता. मात्र, ते दौर्‍यावरून गेले रे गेले की पुन्हा पोवई नाका ते राधिका रस्त्यावर टपर्‍यांचा  बाजार भरतो.

 शाळांपासून 100 मीटर परिसरात तंबाखूजन्य पदार्थ विक्री करण्यास न्यायालयाने मनाई केली आहे. शक्यतो बहुतांश पानटपर्‍यांतच गुटखा, सिगारेट व इतर तंबाखूजन्य पदार्थ विक्री होत असते. अशा अनेक टपर्‍या शाळांच्या नजिक असलेल्या दिसून येतात.  त्यामुळे कायदा धाब्यावर बसून टपरीधारकांची मनमानी सुरू आहे. याबाबत प्रशासनही अक्षम्य दुर्लक्ष करत असते.

गावगुंडांना हाताशी धरून टपरीवाल्यांचा जुगाड

सातारा शहरातील स्थानिक जे व्यवसाय करू इच्छितात, मात्र, यासाठी मुख्य अडचण येते जागेची. जागा मालक अवास्तव भाडे व डिपॉझिट सांगत असल्यामुळे अनेकांना आहे ते दुकान बंद करण्याची वेळ येते. याचवेळी परप्रांतातून येणारी मंडळी अतिक्रमण करून टपरी टाकत असतात. मात्र, हे भुमिपूत्र करू शकत नाहीत. त्यांना कोठे मोकळी जागा आहे, ती पालिकेची आहे, की अन्य कुणाची याचा सुगावाही लागत नाही. तोपर्यंत परप्रांतियांनी याठिकाणी पथारी पसरलेली असते. याचाच अर्थ काही गावगुंड व काही तथाकथित  संघटनांच्या पदाधिकार्‍यांना हाताशी धरून त्यांचे हे उद्योग चाललेले असतात. त्यांच्यामार्फत जुगाड करण्याचा त्यांचा प्रयत्न असल्यामुळे शासनाचा महसूल मात्र बुडत असतो. संबंधित शासकीय कर्मचारीही याकडे दुर्लक्ष करतात, यामागचे गौडबंगाल न कळण्या इतकी जनताही दुधखुळी राहिलेली नाही.

टपर्‍यातून नक्‍की काय काय विकले जाते? 

सातारा-कोरेगाव रस्त्यावरील जिल्हा परिषद चौक, विसावा नाका, विसावा पार्क व पुढे बॉम्बे रेस्टॉरंट चोक ते संगमनगर या मार्गावर विक्रेत्यांनी पुन्हा दुकाने थाटली. जि. प. चौकातून शासकीय विश्रामगृह, विसावा नाका परिसर,  विसावा कॅम्प समोरील छ.शाहू अ‍ॅकॅडमी रस्ता ते बॉम्बे रेस्टॉरंट पुढे कृष्णानगर, संगमनगरपर्यंत टपर्‍यांनी पदपथ काबीज केला. सुरुवातीला काहींनी छत केले.आता त्या ठिकाणी पक्‍की खोकी टाकण्यात आली आहेत. बॉम्बे रेस्टॉरंट चौकातील उड्डाणपूलाखाली तर दिवसेंदिवस टपर्‍यांमध्ये वाढ होत आहे. येथील बेरोजगारीच्या नावाखाली टाकलेल्या टपर्‍यांमधून नक्की काय विकले जाते हा संशोधनाचा विषय असला तरी त्याकडे बांधकाम विभागाची होणारी डोळेझाक अर्थपूर्ण असल्याची चर्चा सुरु आहे. येथील चौकानजीक बांधकाम विभागाची जागा असून तेथे सध्या झोपड्यांचे मोठे अतिक्रमण आहे.