होमपेज › Satara › महिलांच्या राजकीय, सामाजिक सक्षमीकरणाची गरज : श्‍वेता सिंघल

महिलांच्या राजकीय, सामाजिक सक्षमीकरणाची गरज : श्‍वेता सिंघल

Published On: Mar 09 2018 1:37AM | Last Updated: Mar 08 2018 11:08PMसातारा : प्रतिनिधी

भारतीय संविधानाने प्रत्येकाला मतदानाचा अधिकार दिला आहे.  मतदानाच्या हक्‍कासाठी महिलांनी जागृत होवून मतदार नोंदणी केली पाहिजे. देशाच्या सर्वांगिण विकासासाठी महिलांचे सामाजिक तसेच राजकीय सक्षमीकरण झाले पाहिजे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांनी केले.
जिल्हा  परिषदेच्या स्व. यशवंतराव चव्हाण बहुद्देशीय सभागृहात राज्य निवडणूक आयोगाच्यावतीने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय महिला दिन कार्यक्रमात श्‍वेता सिंघल बोलत होत्या. कार्यक्रमास

मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे, उपमुख्य निवडणूक अधिकारी शिरीष मोहोड, अतिरिक्‍त जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी सचिन बारवकर, निवडणूक उपजिल्हाधिकारी मंजूषा मिसकर, सातारा प्रांताधिकारी डॉ. स्वाती देशमुख, कोरेगाव प्रांताधिकारी कीर्ती नलावडे, रेवती शिंदे, सिने अभिनेत्री श्‍वेता शिंदे, आंतरराष्ट्रीय धावपटू ललिता बाबर, पिस्तुल नेमबाज राही सरनोबत, जलतरणपटू स्नेहल कदम, रायफल  नेमबाज रुचिरा लावंड, सातारा तहसीलदार नीलप्रसाद चव्हाण प्रमुख उपस्थित होते. 
श्‍वेता सिंघल म्हणाल्या, समाजात महिलांना दुय्यम वागणूक दिली जाते. ही परिस्थिती बदलण्यासाठी परिवर्तन करणे गरजेचे आहे.  मुलींना शिक्षण दिल्याशिवाय तिचे आर्थिक सक्षमीकरण होत नाही.

आर्थिकदृष्ट्या ती स्वयंपूर्ण झाली तर राजकीय आणि सामाजिकदृष्ट्या ती सक्षम होते. डॉ. कैलास शिंदे म्हणाले, महिला सक्षम झाली तर कुटुंबाची प्रगती होते. ‘असर’ संस्थेने शाळांच्या केलेल्या पाहणीत गुणवत्‍तेत मुली पुढे आहेत. महिलांनी मतदार नोंदणीत सहभागी व्हावे. शिरीष मोहोड म्हणाले, राज्यात महिला तसेच युवक मतदारांचे प्रमाण कमी असल्याने त्यासाठी विशेष मोहिम हाती घेण्यात आली आहे.
यावेळी श्‍वेता शिंदे, राही सरनोबत, स्नेहल कदम यांनी मनोगत व्यक्‍त केले.पूजा पवार, कोमल घार्गे या विद्यार्थिनींनी स्त्रीभ्रूणहत्या व महिला सक्षमीकरणावर भाषणे केली. आभार सामाजिक संस्थेच्या कलाकारांनी मतदार जागृतीवर पथनाट्य सादर केले. श्‍वेता शिंदे, ललिता बाबर, राही सरनोबत,  स्नेहल कदम, रुचिरा लावंड यांचा यावेळी गौरव करण्यात आला.
उत्कृष्ठ महिला मतदार नोंदणी अधिकारी म्हणून डॉ. स्वाती देशमुख, कीर्ती नलावडे, रोहिणी आखाडे, स्मिता पवार, सहायक पोलिस अधीक्षक राजलक्ष्मी शिवणकर यांचा सन्मान करण्यात आला.

महिला मतदार नोंदणी कार्यक्रमानिमित्‍त घेण्यात आलेल्या चित्रकला, रांगोळी, वक्‍तृत्व स्पर्धेत जिल्हास्तर यश मिळवलेल्या विद्यार्थीनींचा सत्कार करण्यात आला. महिलांना ओळखपत्रे वाटण्यात आली. अस्मिता सॅनेटरी नॅपीकन योजनेचा शुभारंभ करण्यात आला. डॉ. स्वाती देशमुख यांनी आभार मानले.  यावेळी विविध खात्याचे प्रमुख उपजिल्हाधिकारी, तहसीलदार आदि उपस्थित होते.