होमपेज › Satara › श्रीनिवास पाटील डॉक्टर ऑफ सायन्स पदवीने सन्मानित 

श्रीनिवास पाटील डॉक्टर ऑफ सायन्स पदवीने सन्मानित 

Published On: Jun 16 2018 1:32AM | Last Updated: Jun 15 2018 10:48PMकराड : प्रतिनिधी 

सिक्किमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांना इन्स्टिट्यूट ऑफ चार्टड फायनान्सियल अ‍ॅनॅलिस्ट ऑफ इंडिया, सिक्किम युनिर्व्हसिटीने डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी देवून त्यांचा गौरव केला आहे. 

ग्रामीण भागात जन्म झालेल्या पाटील यांनी शैक्षणिक जीवनात योग्य वाटचाल करत सनदी अधिकारी म्हणून उच्च पदावर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी काम केले व राजकीय जीवनात खासदार म्हणून महाराष्ट्रातून दोनवेळा लोकसभेवर निवडून जावून महाराष्ट्रातील जनतेची सेवा केली. व त्यानंतर सिक्किमचे राज्यपाल म्हणून गेली पाच वर्षे सिक्किम राज्यातील जनतेशी एकरूप होवून राज्याच्या जैविक शेतीला प्रोत्साहन दिले.

येथील खेळ, सांस्कृतिक उपक्रम, शैक्षणिक प्रगतीला जो हातभार  लावला तो लक्षात घेवून इकफाई युनिर्व्हसिटीने डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी युनिर्व्हसिटीच्या अध्यक्षा श्रीमती शोभाराणी यांचे हस्ते त्यांना देण्यात आली. इकफाई युनिर्व्हसिटीचा पदवीदान समारंभावेळी सिक्किम राज्याचे मुख्यमंत्री पवन चामलिंग, मानव संसाधन विकास मंत्री आर. बी. सुब्बा, मुख्यसचिव ए. के. श्रीवास्तव, कुलगुरू प्रो. राम पाल कौशिक, उपकुलगुरू डॉ. जगन्नाथ पटनाईक, सौ. रजनीदेवी पाटील उपस्थित होते.  यावेळी डॉ. श्रीनिवास पाटील म्हणाले, मला मिळालेला सन्मान सिक्किमवासियांना समर्पित करत आहे. माझे कुटुंबिय, हितचिंतक, सिक्किमवासिय यांच्या प्रेमापोटी हा सन्मान स्वीकारत आहे.