Tue, Apr 23, 2019 13:36होमपेज › Satara › फलटणला अत्याधुनिक शहर म्हणून पुढे आणू

फलटणला अत्याधुनिक शहर म्हणून पुढे आणू

Published On: Sep 02 2018 1:18AM | Last Updated: Sep 01 2018 11:29PMफलटण : प्रतिनिधी

फलटण शहराला लाभलेला सांस्कृतिक वारसा हा या शहराची ऐतिहासिक ओळख आहे. येथे सुरु असलेल्या शेती, औद्योगिक, शैक्षणिक विकासाच्या पार्श्‍वभूमीवर या शहराला अत्याधुनिक शहर म्हणून पुढे आणण्याचा प्रयत्न कमिन्स या अंतरराष्ट्रीय संस्थेच्या माध्यमातून सुरु असताना फलटण नगर परिषद आणि येथील नागरिक त्यांना निश्‍चित साथ करतील आणि आगामी काळात फलटण एक आदर्श शहर बनेल, असा विश्‍वास विधान परिषद सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केला. 

‘लोकसहभागातून घनकचरा व्यवस्थापन’ या विषयीच्या अभिनव संकल्पनेची माहिती घेवून त्याच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी नगर परिषद सभागृहात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, सभापती सौ. रेश्मा भोसले, नगराध्यक्षा सौ. निता नेवसे, उपनगराध्यक्ष नंदकुमार भोईटे, कमिन्स संयुक्त सामाजिक बांधीलकी विभागाचे रितेश जोशी, संगीता गुप्ते, आरोहणम या स्वयंसेवी संस्थेच्या ज्योती सातव, समीर बोटे, लक्ष्मीकांत जंबगी आदी उपस्थित होते. 

ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर म्हणाले, राज्य शासनाने घनकचरा व्यवस्थापनाला प्राधान्य देत स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून संपूर्ण राज्यभर यंत्रणा निर्माण केली असून फलटण शहरासाठीही राज्य शासनाने निधीची तरतूद केली आहे. कमिन्सने पुढाकार घेवून फलटण शहरासाठी घेतलेल्या भूमिकेला आपण स्वत: आणि नगर परिषदेच्या माध्यमातून संपूर्ण सहकार्य करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

घनकचरा व्यवस्थापनासाठी स्वयंसेवी संस्था आणि शहरवासीयांचे गट यांच्यामध्ये ठराविक कालावधीने सुसंवाद घडवणे, घनकचरा व्यवस्थापनाबाबत असलेल्या सूचना व तक्रारींचे निराकरण करणे, घंटा गाड्यांचे मार्ग आणि वेळा निश्‍चित करुन या गाड्यांमध्ये बिघाड झाल्यास पर्यायी वाहनाची सुविधा उपलब्ध करुन देणे या गाड्यांवर जीपीएस यंत्रणा बसवून त्यांच्यावर योग्य नियंत्रण ठेवण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्याची आवश्यकता यावेळी नमूद करण्यात आली. प्रारंभी नगराध्यक्षा सौ. निता नेवसे यांनी सर्वांचे स्वागत केले.  नगरसेवक अजय माळवे आणि कोळकीचे माजी सरपंच दत्तोपंत शिंदे यांनी घनकचरा व्यवस्थापनातील समस्यांबाबत विवेचन केले.