Fri, Apr 26, 2019 17:21होमपेज › Satara › श्री क्षेत्र महाबळेश्‍वर

श्री क्षेत्र महाबळेश्‍वर

Published On: Aug 20 2018 12:06AM | Last Updated: Aug 19 2018 10:55PMश्रावणी सोमवारी श्री क्षेत्र महाबळेश्‍वरमध्ये भाविकांची गर्दी होत असते. या क्षेत्राचे महात्म्य अपार असून श्रावणी सोमवारनिमित्त या क्षेत्राची महती... 

भक्तांच्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी आपण येथे वास्तव्य करावे, अशी मागणी महाबळाने विष्णूंकडे केली आणि भक्तवत्सल विष्णू, ब्रह्मा आणि शिवाने ती मान्य केली. तेव्हापासून क्षेत्र महाबळेश्‍वर त्रिगुणात्मक म्हणून प्रसिद्धीस आले. पवित्र अशा कृष्णा गंगेच्या पाण्याचा शिवलिंगावर सदैव अभिषेक होत असतो, म्हणूनच श्री गणेशाय नम:, श्री सरस्वते नम: याबरोबरच श्री महाबळेश्‍वराय नम: असा जप करुन महाबळेश्‍वराच्या भक्तीभावाची येथे उजळणी केली जाते.क्षेत्र महाबळेश्‍वरला  धार्मिकतेबरोबर ऐतिहासिक महत्वही आहे. श्रीशंभू महादेवाचा वास या नदी तीरावर उगमापासून मुखापर्यंत असल्याने या नदीला विशेष महात्म्य आहे. महाबळेश्‍वराला रामायण काळापासूनचा इतिहास आहे. लंकाधिपती रावण जेव्हा शिवाचे आत्मलिंग लंकेस घेवून जात होता. तेव्हा त्या आत्मलिंगाचे दोन कण सह्याद्री पर्वतावर पडले आणि त्यातूनच महाबळ आणि अतिबळ हे दोन राक्षस निर्माण झाले. त्यांनी असूर प्रवृत्तीने गोंधळ घालावयास सुरुवात केल्यानंतर स्वयं ब्रह्मा, विष्णू, महेश यांनी त्यांचे निर्दालन केले. अतिबळाला मारल्यानंतर महाबळ देवाधिदेवाला शरण आला. त्याने मागितलेल्या वरानुसार या क्षेत्री भगवान ब्रह्मा, विष्णू आणि महेश वास्तव्य करुन आहेत आणि ते भक्तांचे सदैव रक्षण करत आहेत.  शिवलिंग हे त्रिगुणात्मक आहे. हे त्रिगुणात्मक शिवलिंग भक्तांची मनोकामना पूर्ण करणारे, पवित्र तसेच रमणीय क्षेत्र आहे. आजदेखील भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणारे असे अनुभवसिद्ध क्षेत्र महाबळेश्‍वर हे ठिकाण आहे.

- प्रेषित गांधी