Tue, May 26, 2020 17:04होमपेज › Satara › श्री जानुबाईदेवी, असवली नवरात्रौत्सव विशेष

श्री जानुबाईदेवी, असवली नवरात्रौत्सव विशेष

Published On: Oct 16 2018 2:00AM | Last Updated: Oct 15 2018 8:46PMश्रीकृष्ण यादव, खंडाळा

खंडाळा तालुक्यातील असवली या ऐतिहासिक व सांस्कृतिक परंपरा लाभलेल्या गावची ग्रामदेवता श्री जानूबाई देवीचा नवरात्रौत्सव हा जिल्ह्यातील वैशिष्ट्यपूर्ण उत्सव आहे. त्यानिमित्त असवलीच्या या उत्सव परंपरेचा घेतलेला आढावा....

असवली गाव सह्याद्रीच्या डोंगररांगेतील महादेव डोंगरालगत खंडाळ्याच्या पश्‍चिमेला 7 कि.मी. अंतरावर आहे. या गावची ग्रामदेवता श्री जानूबाई देवीचे मंदिर ऐतिहासिक व पुरातन आहे. हे मंदिर 350 वर्षांपूर्वी बांधलेले आहे. मंदिराची रचना हेमांडपंथी असून संपूर्ण बांधकाम दगड व चुन्यात केलेले आहे. मंदिराचा कळस चार टप्प्यात बांधलेला असून मुख्य गाभारा चौरसाकृती असून वर अष्टकोनी दगडी शिखर बांधलेले आहे. शिखरावर देवीच्या विविध रुपातील मूर्तीची शिल्पे कोरलेली आहेत. मुख्य मंडप 16 दगडी खांबावर उभारला असून मंडपात पितळी सिंह, कासव यांच्या मूर्ती आहेत. श्री जानुबाई देवीची मूर्ती पाषाणाची आहे. या मूर्तीच्या डाव्या हातात त्रिशुल असून उजव्या हाताने महिषासुराच्या जटा धरलेल्या आहेत. त्यामुळे या देवीला महिषासूर मर्दिनी, जननीमाता, जन्‍नीमाता, जानुबाई या नावाने ओळखले जाते. देवीच्या मस्तकावर श्री शंभू महादेवाचे शिवलिंग धारण केले आहे. या मूर्तीला 65 वर्षांपूर्वी मेढेकर कुटुंबियांनी वज्रलेप केला आहे. मुख्य मूर्तीसोबतच मंदिरात अतिप्राचीन चार मूर्ती असून ती देवीची विविध रुपे असल्याचे दिसते. मंदिराच्या गाभार्‍याच्या उत्तरेस जलाभिषेकाचे पाणी वाहून नेण्यासाठी गोमुखाची व्यवस्था असून येथील जल पवित्र मानून भक्‍तांकडून ते प्राशन केले जाते. मंदिराच्या सभोवती दगडी संरक्षक भिंत असून पूर्वेला मुख्य दगडी प्रवेशद्वार आहे तर उत्तरेला दिंडी दरवाजा आहे. मंदिराच्या उत्तरेस सर्वेश्‍वर (महादेव) मंदिर, जांबुवंत, मारुती मंदिर, ढमाळांचे कुलदैवत श्री खंडोबा, म्हाळसा, बानुबाई (जेजुरी) यांचे एकत्रित मंदिर आहे. संकपाळ भावकीचे कुलदैवत वाडी रत्नागिरीचा जोतिबा यांचेही मंदिर आहे. गावातील मुख्य भावकी ढमाळ व संकपाळ यांच्या कोणत्याही कार्याची सुरुवात कुलदैवत खंडोबा, जोतिबा व ग्रामदेवता जानूबाई यांचे दर्शन घेवूनच होते. ही परंपरा शतकानुशतके सुरु आहे.

मंदिराच्या आवारात दगडी चौथर्‍यावर बगाड उभारण्यात आलेले असून यात्रा कालावधीत नवसकरी ग्रामस्थ या बगाडाला नारळाचे तोरण बांधून बगाडाला लोंबकळत एक फेरी पूर्ण करुन आपला नवस फेडतात. हे मंदिर शिवकालीन असून मंदिर आवारात हत्तीमहाल आहे. या मंदिराच्या बांधकामावेळी लागणारे अवजड एकसंध दगड हत्तीच्या सहाय्याने आणले जात. हत्ती महालात माहुताचे व हत्तींचे वास्तव्य होते. मंदिरासमोर दोन दीपमाळ असून एक दीपमाळ 45 फूट तर दुसरी 15 फूट उंचीची असून उत्सव काळात या दीपकाळ अविरत प्रज्वलित ठेवल्या जातात. मुख्य प्रवेशद्वाराजवळच द्वारपालांच्या मूर्ती आहेत. हे देवीचे रक्षक असल्याचे सांगितले जाते. मुख्य दरवाजाच्या  दक्षिणेस हेमांडपंथी जलकुंड असून येथे कायमस्वरुपी शीतल पाणीसाठा असतो. मंदिराच्या पाठीमागे पुरातन आड ही होता. मात्र, नवरात्रकाळात उभे नवरात्र पाळणार्‍या भक्‍तांची संख्या वाढल्याने  त्यांना रात्रीच्यावेळी मंदिर परिसरात वास्तव्य करण्यासाठी मोठा मंडप उभारण्यात आला आहे. त्यासाठी तो आड मुजवण्यात आला आहे.
कुलस्वामिनी श्री जानूबाई देवी ही पार्वतीचा अवतार आहे. महिषासूरमर्दिनी श्री जानूबाई देवी ही नवसाला पावणारी असल्याने भक्‍तगण आपल्या अडचणी दूर होण्यासाठी देवीला साकडं घालतात. आपल्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी देवीला नवस करतात. मुल होत नसेल तर नवरात्रात घट उठतात त्या दिवशी देवळात घाटीखाली नवस बोलतात. ‘देवी तुझी नऊ दिवसाची उभ्याची नवरात्री करीन’ नवस बोलणार्‍या व्यक्‍तीला पुजारी त्यांच्या गळ्यात माळ घालतात. काही मंडळी नवस न करताही स्वेच्छेने नवरात्र धरतात.

वैशिष्ट्यपूर्ण उभ्याचे नवरात्र

नवरात्र काळात उभ्याचे नवरात्र धरणारी व्यक्‍ती 9 दिवस अनवाणी राहते. या काळात जमिनीवर बसायचे नाही, झोपायचे नाही, जमिनीला पाठ टेकवायची नाही. 9 दिवस उपवास धरायचे. सर्व व्यवहार उभे राहूनच करायचे असतात. दिवसेंदिवस देवीच्या भक्‍तांची संख्या वाढत आहे. असवलीमधील काही नागरिकांनी अविरत 60 वर्षे उभ्याचे नवरात्र धरले आहे. नव्या पिढीतील तरुणही यात सहभागी आहेत. दरवर्षी सुमारे 100 हून अधिक भक्‍त उभ्याचे नवरात्र धरतात. नवरात्रकाळात दिवसभर गावच्या वेशीत नवरात्रकर्‍यांना दैनंदिन व्यवहार करता येतात. मात्र, रात्री मंदिर परिसरातच वास्तव्य करावे लागते. मंदिरात नवरात्रकर्‍यांसाठी खांबांना झोपाळे बांधलेले असतात. याच झोपाळ्यावर छाती, डोके टेकवून मात्र पाय जमिनीवर ठेवूनच झोपावे लागते. अखंडपणे 9 दिवस अनवाणी, उभ्याने राहूनही उपवास करणार्‍या भक्‍तांना देवीच्या कृपेमुळे कोणताही त्रास होत नसल्याचे उपवासकर्ते सांगतात. नवरात्र काळात सर्व नवरात्रकरी भक्‍तांच्या उपस्थितीत देवीची व इतर देवतांची आरती सकाळी, संध्याकाळी केली जाते.असवलीच्या जानूबाईची वार्षिक यात्रा वैशाख पौर्णिमेला असते.