Thu, May 23, 2019 15:28
    ब्रेकिंग    होमपेज › Satara › धरणग्रस्तांचे दि.२६ पासून कोयनानगर येथे  बेमुदत ठिय्या

धरणग्रस्तांचे दि.२६ पासून कोयनानगर येथे  बेमुदत ठिय्या

Published On: Feb 23 2018 1:17AM | Last Updated: Feb 23 2018 1:17AMसातारा : प्रतिनिधी

कोयना धरणग्रस्तांच्या विविध मागण्यासंदर्भात दि. 26 फेब्रुवारीपासून कोयनानगर ता.पाटण येथे श्रमिक मुक्ती दलाच्यावतीने बेमुदत ठिय्या आंदोलन  करण्यात येणार असल्याची माहिती श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष व राष्ट्रीय संघटक डॉ. भारत पाटणकर यांनी दिली.

कोयना धरणग्रस्तांचे दि. 23 जानेवारीपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू होते. मात्र मुख्यमंत्री परदेशी असल्यामुळे प्रकल्पग्रस्तांनी आंदोलनाला सुट्टी देवून मुख्यमंत्र्यांच्या प्रतिसादाची वाट पाहण्याचा निर्णय घेतला. गेली 58 वर्षे  कोयना धरणग्रस्तांचे प्रश्‍न प्रलंबित आहेत, त्यांचे पुनर्वसन 100 टक्के करण्याची कार्यवाही पूर्ण होण्यासाठी मुख्यमंत्र्यासमवेत बैठक होवून शासनाकडे पाठविण्यात आलेल्या प्रस्तावांना मंजुरी मिळण्याची कार्यवाही तातडीने होणे गरजेचे आहे.महाराष्ट्राच्या विकासात महत्वाच्या वाटा असणार्‍या कोयना धरणग्रस्तांना एवढा काळ संघर्ष करावा लागणे, ही लाजीरवाणी बाब आहे. कोयना धरणग्रस्तांचे 100 टक्के पुनर्वसन होण्याची प्रक्रिया तातडीने राबवली जावी. मुख्यमंत्री परदेशातून परत येवून बरेच दिवस झाले. परंतु या बाबत काहीही हालचाली होत नाहीत. त्यामुळे कोयना धरणग्रस्तांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.

कोयना धरणग्रस्त व अभयारण्यग्रस्त यांच्या विकसनशील पुनर्वसनासाठी सातारा जिल्हाधिकारी कार्यालय आणि मंत्रालयात वॉर रूम सुरू करावी, कोयना धरणग्रस्तांना 2013च्या राष्ट्रीय भूसंपादन पुनर्वसन कायद्याच्या सर्व तरतुदी लागू करून त्यांचा लाभ देण्याची प्रक्रिया तातडीने सुरू करावी यासह विविध मागण्यासंदर्भात दि.26 फेब्रुवारीपासून बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती डॉ.भारत पाटणकर यांनी दिली.