होमपेज › Satara › श्रमदानाने उन्हाळ्यातही शिवारे फुलली 

श्रमदानाने उन्हाळ्यातही शिवारे फुलली 

Published On: Apr 18 2018 12:56AM | Last Updated: Apr 17 2018 10:41PMऔंध : वार्ताहर

सध्या खटाव तालुक्याच्या पश्‍चिम पट्टयातील अनेक गावे, वाडयावस्त्यांवर वॉटर कप स्पर्धेच्या माध्यमातून पाणी आडवा व पाणी जिरवा या मोहिमेने गती घेतली आहे. त्यामुळे रब्बी हंगामानंतर मोकळी झालेली शिवारे सकाळी व सायंकाळी श्रमदानासाठी जाणार्‍या  स्थानिक नागरिक, महिला, युवकांनी फुलून जात आहेत. वास्तवामध्ये असणारी जलतूट या कामांमुळे खरीच भरून निघणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. 

सध्या औंध भागातील गणेशवाडी, गोपूज, खबालवाडी, वडी, निमसोड, लोणी व अन्य गावांमध्ये  नागरिक, महिला, युवक खांद्याला खांदा लावून आपली गावे पाणीदार होण्यासाठी परिश्रम घेत आहेत. अनेक गावांमधील प्रतिनिधींनी यासाठी पुणे येथे जाऊन प्रशिक्षणही घेतले आहे. डीपसीसीटी, माती बांध, ओढ्यातील गाळ काढणे, पात्राचे खोलीकरण, तलाव दुरुस्ती व अन्य कामांना यामध्ये प्राधान्य देण्यात आले आहे. मात्र सिमेंट बंधार्‍यांची कामे यामध्ये होणे अपेक्षित आहे. ज्यामुळे मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी अडणार आहे. ती कामे यामध्ये नसल्यामुळे पाणी कसे अडवले जाणार व टिकणार? हा खरा प्रश्‍न आहे. त्यामुळे दुष्काळी गावांची प्रत्यक्षात जलतूट भरून येणे अशक्य असल्याचे बोलले जात आहे. ही जलतूट भरावयाची असेल तर यासाठी शासनाने निधी उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.

तरच या श्रमाला खर्‍या अर्थाने मूर्त स्वरूप येईल. अनेकांनी  माझा गाव पाणी टंचाईमुक्त, पाणीदार झाला पाहिजे यासाठी  तन, मन, धन अर्पूण या यज्ञात हिरीरीने सहभाग घेतला आहे. पुढील पंचेचाळीस दिवस ही कामे चालणार आहेत. त्यामुळे दुष्काळी जनतेच्या श्रमाचे खरेच सोने करावयाचे असेल तर शासनाने प्रत्येक गावामध्ये भरीव कामासाठी त्यामध्ये नवीन तलाव, सिमेंट बंधारे यासाठी खास निधी उपलब्ध करणे आवश्यक बनले आहे.

210 गावांत जलतूट

जिल्ह्यात दोनशे दहा गावांमध्ये मोठी जलतूट आहे . पावसाचे वाहून जाणारे पाणी प्रत्यक्षात अडवायचे असेल तर ठोस पाण्याचे स्त्रोत निर्माण करणे गरजेचे आहे, असे मत या क्षेत्रातील जाणकार मंडळींमधून व्यक्त केले जात आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणात पाणी अडविण्यासाठी सिमेंट बंधार्‍यांची कामे दुष्काळी पट्टयात होणे गरजेचे बनले आहे.