Tue, Jul 16, 2019 11:42होमपेज › Satara › छिंदमच्या प्रतिमेला जोडे मारले, पुतळ्याचेही दहन

छिंदमच्या प्रतिमेला जोडे मारले, पुतळ्याचेही दहन

Published On: Feb 18 2018 2:03AM | Last Updated: Feb 17 2018 10:33PMसातारा : प्रतिनिधी

नगर महानगरपालिकेचे निलंबित उपमहापौर श्रीपाद छिंदम याने छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्‍तव्य केल्याचे सातारा जिल्ह्यातही संतप्‍त पडसाद उमटले. शनिवारी राष्ट्रवादी युवकच्यावतीने छिंदमच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले तर मनसेने जोडे मारो आंदोलन केले. सातार्‍यासह जिल्ह्यात ठिकठिकाणी शिवप्रेमींचा संताप अनावर झाला होता. 

छिंदमच्या वक्‍तव्याने सातारा जिल्ह्यातील समाजमन संतप्‍त झाले असून शनिवारी दुसर्‍यादिवशीही ठिकठिकाणी शिवप्रेमींच्या संतापाचा उद्रेक झाला. सातार्‍यात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने पोवईनाका येथे श्रीपाद छिंदम याच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. युवकचे जिल्हाध्यक्ष तेजस शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. तेजस शिंदे म्हणाले, भाजपा शिवरायांच्या नावाचा वापर करून सत्तेवर आले.

मात्र, ज्यांच्या नावावर आपण सत्ता मिळवली त्यांचाच विसर भाजपाला पडला आहे. त्यांच्याच पक्षातील नेते आमच्या दैवताचा अपमान करत आहेत. त्यांच्याविषयी अपशब्द वापरून समाजात जातीय तेढ निर्माण करत आहेत. त्यामुळे भाजपाचा खरा चेहरा समोर आला आहे. आंदोलनात प्रदेश सरचिटणीस गोरखनाथ नलवडे, संघटक सचिव बाळासाहेब महामुलकर, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अतुल शिंदे, विक्रांत शिर्के, समीर घाटगे,  मल्लेश मुलगे, मंगेश ढाणे, सागर जगताप, महेश जाधव, गिरीश फडतरे, अजित बर्गे, पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

मनसेने मारले जोडे 

श्रीपाद छिंदम याचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना सातारा शहरच्यावतीने पोवईनाका येथे निषेध करून छिंदमच्या प्रतिमेला जोडे मारण्यात आले. मनसे शहराध्यक्ष राहुल पवार यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर श्रीपाद छिंदमच्या प्रतिमेस जोडो मारो आंदोलन करून निषेधाच्या घोषणा दिल्या. यावेळी उपाध्यक्ष सुहास रणदिवे, दिलीप सोडमिसे, अझहर शेख, वैभव वेळापुरे, संतोष सासवडकर, भरत रावळ, किरण जगदाळे, जगदीश आवटे, अर्जुन शिंदे, मनु शेख, प्रणव मोरे, ऋषी भोसले, अजिंक्य जाधव, अनिकेत साळुंखे व पदाधिकारी,  कार्यकर्ते सहभागी झाले.