Wed, Jun 26, 2019 17:34होमपेज › Satara › लोकसभेत शांतता, शिस्त हवी : शिवराज पाटील 

लोकसभेत शांतता, शिस्त हवी : शिवराज पाटील 

Published On: Feb 19 2018 1:20AM | Last Updated: Feb 18 2018 11:08PMउंडाळे : प्रतिनिधी

स्वातंत्र्य संग्राम सैनिक अधिवेशनाच्या माध्यमातून आजही स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती जपल्या जात आहेत, ही अभिमानास्पद गोष्ट आहे. या अधिवेशनातील शिस्तबद्धता आपणास भावल्याचे सांगत अशीच शिस्त, शांतता लोकसभेतही असायला हवी, असे मत नोंदवत माजी गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांनी लोकसभेत होणार्‍या गदारोळाबाबत खेद व्यक्त केला.

उंडाळे (ता. कराड) येथे स्वातंत्र्य सेनानी दादा उंडाळकर यांच्या 44 व्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित स्वातंत्र संग्राम सैनिक अधिवेशनात ते बोलत होते. यावेळी माजी मंत्री बसवराज पाटील, माजी खा. जयवंतराव आवळे,  विलासराव पाटील - उंडाळकर, रयत कारखान्याचे चेअरमन अ‍ॅड. उदयसिंह पाटील, अ‍ॅड. विजय पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती

शिवराज पाटील म्हणाले, सध्यस्थितीत वैज्ञानिक प्रगतीसोबत समाजाला अध्यात्माची आवश्यकता आहे. आर्थिक, राजकीय तसेच अन्य कोणत्याही शक्तीचा जसा दुरूपयोग होत आहे, तसाच त्याचा चांगला वापर करणेही सहजशक्य आहे. स्वातंत्र्यपूर्व काळापासून सातारा जिल्हा क्रातिकारी जिल्हा म्हणून ओळखला जातो. आज नितीमुल्ये, सर्व धर्मसमभाव यासारख्या विचारांची आवश्यकता आहे. 

सातारा जिल्ह्यात विलासराव पाटील - उंडाळकर हे विचार जपत कार्यक्रम राबवतात. हे कार्यक्रम संपूर्ण देशासाठी प्रेरणादायी असून इतरांनीही यापासून आदर्श घेण्याची गरज असल्याचे मत शिवराज पाटील - चाकूरकर यांनी व्यक्त केले.

विलासराव पाटील - उंडाळकर म्हणाले, स्वातंत्र्यपर्व काळातीळ ध्येयवाद लोप पावता कामा नये. यासाठी आम्ही हा प्रबोधनाचा यज्ञकुंड चालवला आहे. सामाजिक विषमता, जातीय व्यवस्था निर्मूलन यासह सर्व पातळ्यांवर स्वातंत्र्यपूर्व काळापासून सातारा जिल्हा अग्रेसर आहे. दादा उंडाळकर यांच्यासारख्या अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी देशासाठी बलिदान दिले आहे. उंडाळ्यातील स्मारक हे केवळ दादा उंडाळकरांचे यांचे स्मारक नव्हे, तर स्वातंत्र्य संग्राम सैनिकांच्या विचारांचे हे स्मारक आहे. त्याग व बलिदानाचे प्रतीक म्हणून हे व्यासपीठ ओळखले जाईल, असे गौरवोद्ारही यावेळी विलासराव पाटील - उंडाळकर यांनी व्यक्त केले.

प्रारंभी दादा उंडाळकर यांच्या पुतळ्याला मान्यवरांनी अभिवादन केले. कार्यक्रमास दिवंगत स्वातंत्र सेनानी शील भद्र याजी यांचे सुपुत्र सत्यानंद याजी, अभयकुमार साळुंखे, स्वा. सै. आणासाहेब  सापते, उत्तराधिकारी संघटनेचे अध्यक्ष विजय देशपांडे यांच्यासह स्वातंत्र्य सैनिक, त्यांचे उत्तराधिकारी, शेतकरी, युवक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. आभार स्मारक समितीचे विश्‍वस्त अ‍ॅड. विजय पाटील यांनी मानले.