Thu, Aug 22, 2019 08:23होमपेज › Satara › शॉर्टसर्किटने आग लागून संपूर्ण घर बेचिराख

शॉर्टसर्किटने आग लागून संपूर्ण घर बेचिराख

Published On: Dec 23 2017 2:12AM | Last Updated: Dec 22 2017 11:42PM

बुकमार्क करा

पिंपोडे बुद्रुक : वार्ताहर 

पिंपोडे बुद्रुक (ता. कोरेगाव) येथील विनायक जगन्नाथ महाजन यांच्या राहत्या घराला शुक्रवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास शॉर्टसर्किट होऊन आग लागली. आगीत संपूर्ण घर बेचिराख झाले असून सुमारे 35 लाखांचे नुकसान झाले आहे. 

पिंपोडे बु. येथील मुख्य बाजारपेठेच्या मध्यावर विनायक जगन्नाथ महाजन व सुभाष  महाजन यांचे घर आहे. विनायक महाजन यांचा मुलगा विक्रम यांचा भुसार मालाचा व्यवसाय आहे. ते पत्नी, मुले व आईला सोबत घेऊन देवदर्शनाला गेले होते तर घरी वडील होते. शुक्रवारी सकाळी नेहमीप्रमाणे विनायक महाजन घराजवळील दुकानात देवपूजा करण्यासाठी गेले. घराच्या मुख्य दरवाजाला बाहेरून कडी घातली होती. यावेळी बाजूला राहत असलेले त्यांचे बंधू सुभाष महाजन यांनी घरातून धूर येत असल्याचे पाहिल्यावर विनायक यांना बोलावले. दरवाजा उघडताच धूराचा प्रचंड लोट बाहेर आला.

आतील बाजूस असलेल्या फ्रीजने पेट घेतल्याने घरातील इतर वस्तूही आगीच्या भक्षस्थानी पडल्या. गावातील युवक मदतीसाठी धावून आले. मात्र, आग आटोक्यात आणायला मर्यादा येत होत्या. वीज पुरवठा बंद केल्याने जवळपास असलेल्या कुपनलिका पाणी असूनही सुरू करता येत नव्हत्या. त्यामुळे दिलीप निकम यांच्या जनरेटरने दोन कुपनलिकांचे पाणी युवक मिळेल त्या भांड्याने घेवून आगीवर ओतू लागले. त्यामुळे शेजारील घरांचे नुकसान वाचले अन्यथा मोठी हानी झाली असती.वाठार स्टेशन पोलिस स्टेशनचे सपोनि मयूर वैरागकर आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.

किसनवीर साखर कारखान्याचा अग्निशामक बंब दाखल झाला.पाठोपाठ शरयु अ‍ॅग्रो इंडस्ट्रीजचाही बंब आल्याने आग आटोक्यात आली.नंतर फलटण नगरपरिषदेचाही बंब आला. आगीत महाजन कुटुंबियांचे सर्व संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले.  कोरेगावचे नायब तहसीलदार रांजणे यांनी भेट दिली, घटनेचा पंचनामा पिंपोडे बुद्रुकचे मंडलाधिकारी फरांदे, तलाठी सुहास सोनावणे, ग्रामसेवक शशिकांत माने यांनी केला असून 3 लाख 55 हजारांची रोकड, 31 तोळे सोने, फर्निचर, आणि संसारोपयोगी साहित्य असे मिळून 34 लाख 50 हजारांचे नुकसान झाल्याचा पंचनामा केला आहे. घटनेची नोंद वाठार स्टेशन पोलीस ठाण्यात झाली आहे.