Wed, Jun 26, 2019 18:28होमपेज › Satara › आरोग्य केंद्रात औषधांचा तुटवडा

आरोग्य केंद्रात औषधांचा तुटवडा

Published On: Jul 01 2018 1:53AM | Last Updated: Jun 30 2018 10:13PMसातारा : प्रतिनिधी

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात गेल्या काही दिवसांपासून औषधांचा तुटवडा जाणवत असल्याच्या तक्रारी आरोग्य समितीच्या सर्वसाधारण सभेत सदस्यांनी केल्या. महामंडळाकडूनच औषधे वेळेवर येत नसल्याने हा तुटवडा भासत असल्याचे आरोग्य अधिकार्‍यांनी सांगितले.

आरोग्य समितीची सर्वसाधारण सभा समितीच्या सभागृहात संपन्न झाली. सभेस डॉ. अभय तावरे, डॉ. भारती पोळ, उषादेवी गावडे, शारदा ननावरे, शंकर जगदाळे, मारूती मोटे, दिपक पवार, भाग्यश्री मोहिते, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार व अधिकारी उपस्थित होते.

प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर गेल्या काही दिवसांपासून औषधांचा तुटवडा भासू लागला आहे. याबाबत प्रशासनाकडे वेळोवेळी तक्रारी केल्या तरी काहीही कार्यवाही होताना दिसत नाही. औषधे मिळत नसल्याने रूग्णांची गैरसोय होत आहे. याबाबत आरोग्य विभागाने त्वरित लक्ष घालण्याची मागणी सदस्यांनी केली. हापकीन महामंडळाकडून वेळेत औषधे उपलब्ध होत नसल्यानेच औषधांचा तुटवडा जाणवत असल्याचे डॉ. भगवान पवार यांनी सांगितले. मात्र औषधे वेळेत उपलब्ध व्हावीत यासाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू असल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले.

सातारा जिल्ह्यात दि. 13 ते 17 जुलैअखेर संत ज्ञानेश्‍वर महाराज पालखी सोहळ्याचे प्रस्थान होणार असल्याने पालखी मार्गावरील  पाणी पुरवठा करणार्‍या विहिरीमध्ये टीसीएलचा वापर करावा, जेणेकरून शुध्द व स्वच्छ पाणी मिळण्यास मदत होईल. त्यादृष्टीने आरोग्य विभागाने काळजी घेण्याच्या सूचना सदस्यांनी केल्या. पालखी सोहळ्यात सुमारे 20 हून अधिक आरोग्य पथके तैनात करण्यात आली आहेत. या पथकाद्वारे वारकर्‍यांना आरोग्य सेवा देण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे डॉ. भगवान पवार यांनी  सांगितले. सभेत राष्ट्रीय कुटुंब कल्याण कार्यक्रम, आरसीएच, जन्म मृत्यू नोंदणी, स्त्री पुरूष जन्मप्रमाण, साथरोग, कुष्ठरोग, क्षयरोग, हिवताप, एनएचएम इत्यादी योजनांचा आढावा घेण्यात आला. तसेच  प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्राच्या बांधकामांचा आढावा घेण्यात आला.