Tue, May 21, 2019 18:43होमपेज › Satara › ‘शिवशाही’ अडकली लाल फितीत

‘शिवशाही’ अडकली लाल फितीत

Published On: Apr 18 2018 12:56AM | Last Updated: Apr 17 2018 10:38PMसातारा : प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सातारा मध्यवर्ती बसस्थानकाबाहेर एका महिन्यापासून शिवशाही बसेस उभ्या आहेत. मुंबई येथील मुख्य कार्यालयात एसटी महामंडळाच्या वरिष्ठ स्तरावर करार झाला नसल्याने त्यांना अद्यापही बसस्थानकात येण्यास ब्रेक  मिळाला आहे. मात्र, या बसेस गेल्या एका महिन्यापासून बाहेर उभ्या असल्याने धुळीने माखल्या आहेत.

खासगी वाहतूकदारांशी स्पर्धा करण्यासाठी एसटी महामंडळाने विविध मार्गावर अत्याधुनिक अशा शिवशाही बसेस सुरू केल्या आहेत. या बसेस खासगी मालकीच्या आहेत. संबंधित ट्रॅव्हल्सधारकाबरोबर महामंडळाने राज्यातील विविध विभागात करार केला आहे. त्यानुसार या बसेस विविध मार्गावर धावत आहेत. मात्र यातील बहुतांश बसेस मोकळ्याच विविध मार्गावर धावत असताना दिसत आहेत. तिकिट दर जास्त असल्याने प्रवाशी या बसमध्ये बसत नाहीत. उलट लालपरीकडे प्रवाशांचा कल दिसत आहे. त्यामुळेच शिवशाही बससेवा ठिकठिकाणी तोट्यात चालली असल्याचे बोलले जात आहे.

सातार्‍यात फेब्रवारी महिन्यात सातारा बसस्थानक परिसरात  शिवशाहीच्या 5 बसेस दाखल झाल्या आहेत. या बसेस खासगी असल्याने त्यांना सातारा बसस्थानकात प्रवेश  देण्यात आलेला नाही. सध्या जिल्हा मध्यवर्ती बँक ते पारंगे चौक या दरम्यानच्या रस्त्यावर गेल्या एक महिन्यापासून या बसेस उभ्या आहेत. शिवशाही बसेसचे चालक आज बसेस बसस्थानकात घेतील उद्या घेतील या आशेने वाट पाहताना दिसत आहेत. महामंडळाच्या वरीष्ठ कार्यालयाचा आदेश प्राप्त झाल्यानंतरच या बसेस सातारा विभागात रूजू होणार आहेत.

एसटीच्या मुख्य कार्यालयाशी संंबंधित ट्रॅव्हल्सधारकाबरोबर कराराची प्रक्रिया  सुरू आहे.जोपर्यंत करार होत नाही तोपर्यंत या बसेसना सातारा स्थानकात नो एन्ट्री आहे. सातारा स्वारगेट मार्गावर दररोज अर्ध्या तासाला 54 हून अधिक बसेसच्या फेर्‍या होत असतात. या मार्गावरील कोणत्याही फेर्‍या बंद न करता शिवशाही बसेस सातारा स्वारगेट मार्गावर चालवण्याचा  महामंडळाने घाट घातला असल्याचे समजते. 

 

Tags : satara, satara news, Shivshahi bus, Satara central bus station,