Tue, Jun 25, 2019 13:08होमपेज › Satara › शिवशाही बसेस स्थानकाबाहेरच लटकल्या

शिवशाही बसेस स्थानकाबाहेरच लटकल्या

Published On: Feb 26 2018 1:18AM | Last Updated: Feb 25 2018 10:27PMसातारा : प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सातारा मध्यवर्ती बसस्थानकासाठी आलेल्या पाच शिवशाही या अलिशान बसेसना अद्यापही सातारा स्टँडमध्ये एंट्री मिळालेली नाही. या बसेस खाजगी तत्वावर महामंडळाने चालवण्यास घेतल्या असल्या तरी मुंबई येथील मुख्य कार्यालयात एसटी महामंडळाच्या वरिष्ठ स्तरावर करार झाला नसल्याने सातार्‍यात येऊनही त्या स्टँडबाहेरच लटकलेल्या आहेत. दरम्यान, या बसेस सातारा स्वारगेट  मार्गावर धावणार  असल्यातरी या गाड्याचे तिकीटदर परवडणारे नसल्याच्या तक्रारी आहेत. 

खासगी वाहतूकदारांशी स्पर्धा करण्यासाठी एसटी महामंडळाने विविध मार्गावर आत्याधुनिक अशा शिवशाही बसेस सुरू केल्या आहेत. या बसेस खासगी मालकीच्या आहेत. संबंधित ट्रॅव्हल्सधारक कंपनीसोबत महामंडळाने राज्यातील विविध विभागात करार केला आहे. त्यानुसार या बसेस विविध मार्गावर धावत आहेत. सातार्‍यात शुक्रवारी सकाळी सातारा बसस्थानक परिसरात  शिवशाहीच्या 5 बसेस दाखल झाल्या आहेत. या बसेस खासगी असल्याने त्यांना सातारा बसस्थानकात प्रवेश करण्यासाठी अद्याप तरी रेड सिग्नल आहे.

सातारा स्टँडजवळ गेल्या 3 दिवसांपासून प्रशासकीय इमारतीलगत असलेल्या  रस्त्यावर या पाच शिवशाही बसेस ताटकळत उभ्या आहेत. याबाबत महामंडळाच्या सातारा विभागातील अधिकार्‍यांशी संपर्क साधला असता ते म्हणाले, एसटीच्या मुख्य कार्यालयाशी संंबंधित ट्रॅव्हल्सधारकाबरोबर कराराची प्रक्रिया  सुरू आहे.जोपर्यंत करार होत नाही तोपर्यंत या बसेसना सातारा स्थानकात नो एन्ट्री आहे.

सध्या  पुणे स्वारगेट मार्गावर  धावणार्‍या एसटी बसेसचे तिकीट दर सुमारे 111 रूपये आहे. या बसपेक्षा शिवशाहीचे तिकीट दर  जादा आहे. जुन्या बसेस सुरुच राहणार असल्यामुळे  सातारा स्वारगेट मार्गावर  धावणार्‍या शिवशाही बसेसना प्रवाशांचा किती प्रतिसाद लाभणार हे पाहणे औत्सुक्याचे आहे.