Mon, Aug 19, 2019 17:31होमपेज › Satara › शिवसेनेचा झेडपी चौकात यज्ञ 

शिवसेनेचा झेडपी चौकात यज्ञ 

Published On: Apr 13 2018 1:19AM | Last Updated: Apr 12 2018 10:33PMसातारा : प्रतिनिधी

जिल्हा परिषद चौकात गेल्या वर्षभरापासून गटाराचा चेंबर उघडा असल्यामुळे नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण झाला असून हा चेंबर तत्काळ बंद करावा, या मागणीसाठी शिवसेनेने अनोखे आंदोलन करत चेंबरवर बसूनच भर रस्त्यात यज्ञ घातला. यावेळी कार्यकर्त्यांनी बोंबाबोंब आंदोलनही केले. 

जिल्हा परिषद चौकामधील हा चेंबर बंद करावा यासाठी अनेकवेळा नगरपालिका व संबंधित प्रशासनाला तोंडी व लेखी पत्रव्यवहार करून देखील कोणतीच कार्यवाही झालेली नाही. यामुळे अनेक किरकोळ अपघात झाले असून यामध्ये नागरिक जखमी झाले आहेत. सातारा कोरेगाव मुख्य रस्ता,  शासकीय विश्रामगृह, कल्याणी इस्टेट असा परिसर असल्याने  हे ठिकाण धोकादायक झालेले आहे. काही दिवसांपूर्वी येथे दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला होता. त्यानंतरही संबंधित प्रशासनाला जाग आलेली नाही. 

घटनेचे गांभीर्य संबंधित विभागाला नसल्याने शिवसेनेच्यावतीने त्याठिकाणी होमहवन करून बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले. तुटलेले चेंबर व नादुरूस्त असलेली जाळी तातडीने दुरूस्त करून ते ठिकाण वाहतुकीस सुरळीत होईल, याची खबरदारी घ्यावी व सामान्य जनतेचे होणारे हाल व नुकसान, अपघात टाळावेत, अन्यथा शिवसेनेच्यावतीने 1 मे रोजी सकाळी 11 वाजता जिल्हा परिषद चौकात रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव यांनी दिला. यावेळी अरे आवाज कुणाचा शिवसेनेचा, जय भवानी, जय शिवाजी, निषेध असो, निषेध  असो, नगरपालिकेचा निषेध असो, अशा विविध घोषणांनी परिसर दणाणून  सोडला होता.

आंदोलनात उपजिल्हाप्रमुख हरिदास जगदाळे, निमिश शहा, रमेश बोराटे, सचिन झांजुर्णे, महेश शिर्के, सचिन जगताप, गिरीष सावंत, अ‍ॅड.शिरीष दिवाकर, रमेश बोराटे, मारूती वाघमारे, पदाधिकारी व कार्यकर्ते  यांचा सहभाग होता.